सरसंघचालक भागवत यांना नोटीस, काठ्या सोबत घेतल्याचं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 06:34 AM2018-11-16T06:34:16+5:302018-11-16T06:34:47+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात काठ्या सोबत घेतल्याचे प्रकरण
नागपूर : रा. स्व. संघाच्या पथसंचलनात काठ्या (दंड) सोबत घेतल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने गुरुवारी सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे, कोतवाली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून ११ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. वैद्य यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली.
या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदविला जावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला आहे. गत २८ मे रोजी पथसंचलन करण्यासाठी संघाला पोलीस उपायुक्तांनी काही अटींसह २६ मे रोजी परवानगी दिली होती. कार्यक्रमात काठ्या, घातक शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके बाळगायची नाहीत, शस्त्रांचे प्रदर्शन करायचे नाही, आतषबाजी करायची नाही, अशा अटी घातल्या होत्या. त्यांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक सदस्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. असे असताना सार्वजनिक रस्त्यांवर काठ्यांसह पथसंचलन करण्यात आले.