आधी पाकिस्तानचा विजयोत्सव साजरा केला, खटला दाखल होताच म्हणाले- 'माफ करा, आमचं करिअर खराब होईल...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:35 PM2021-10-26T18:35:05+5:302021-10-26T18:35:11+5:30
जम्मू-काश्मीर पोलिसांनी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
श्रीनगर: T-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननेभारताचा पराभव केला. यानंतर भारतात अनेक ठिकाणी पाकिस्तानचा विजयोस्तव साजरा केल्याच्या घटना घडल्या. आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याबद्दल दोन वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली(UAPA) कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत.
रविवारी दुबईत झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला, फटाके फोडण्यात आले. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील करण नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस श्रीनगर सौरा यांच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या कृत्याचे समर्थन नाही, पण...
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स युनियनने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मानवतावादी आधारावर UAPA अंतर्गत केलेले आरोप रद्द करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थन करत नाहीत. पण, ही शिक्षा त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. यामुळे मुलांचे भविष्य खराब होऊ शकते. तसेच, युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते, नासेर खुहेमी यांनी एका निवेदनात म्हटले की, UAPA अंतर्गत विद्यार्थ्यांवरील आरोप कठोर शिक्षा आहेत. यामुळे त्यांचे भविष्य उध्वस्त होईल आणि ते कट्टरावादाकडे वळतील. या आरोपांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि करिअरवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतकी कठोर शिक्षा देऊ नये.
'फटाके फोडणाऱ्यांचा डीएनए भारतीय नाही'
हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना पाकिस्तानच्या विजयावर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. पाकिस्तानचा विजयोस्तव साजरा करत फटाके फोडणाऱ्यांचा भारतीय डीएनए असू शकत नाही. आपल्याच देशात दडलेल्या देशद्रोहींपासून सावध राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.