कुठे गायब होताहेत 2 हजारांच्या नोटा? शिवराजसिंह चौहानांना कारस्थानाचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 08:38 AM2018-04-17T08:38:07+5:302018-04-17T08:38:07+5:30
दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी होत असल्याची शक्यता
नवी दिल्ली: काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली. त्यासाठी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यामुळे निर्माण झालेला रोख रकमेचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 2 हजारांची नोट चलनात आणली. मात्र आता दोन हजारांच्या नोटा चलनात फारशा दिसत नसल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांची साठेबाजी सुरु झाली का?, की रिझर्व्ह बँकेनं या नोटांची छपाई कमी केली आहे?, अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहेत.
सध्या मध्य प्रदेश, बिहार, गुजरात यांच्यासह अनेक राज्यांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही वृत्तपत्र आणि संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार, बँक शाखांमध्येही दोन हजारांच्या नोटांची आवक घटली आहे. रिझर्व्ह बँकेनं नोटाबंदीनंतर दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या. त्यांचं मूल्य जवळपास 7 लाख कोटी रुपये होतं. जुलैमध्ये बँकांमध्ये असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांचं प्रमाण 35 टक्के इतकं होतं. नोव्हेंबर 2017 मध्ये हे प्रमाण 25 टक्क्यांवर आलं.
मध्य प्रदेशसोबतच अनेक राज्यांमधील एटीएममध्ये सध्या चांगलाच खडखडाट आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यामागे कटकारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 'काही लोक 2 हजारांच्या नोटांची साठेबाजी करुन चलनाचा तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा नोटाबंदी झाली होती, तेव्हा 15 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात होत्या. आता साडे सोळा कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनात आहेत. मात्र कोणीतरी दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी करुन बाजारात रोख रकमेची कमतरता निर्माण करु पाहतंय. यामागे कारस्थान आहे,' असं चौहान यांनी किसान महासंमेलनात बोलताना म्हटलं.