रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड, आतापर्यंत एवढा ऐवज जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 10:37 AM2023-03-11T10:37:28+5:302023-03-11T10:38:24+5:30
ED Raid on Lalu Prasad Yadav Family: लालूप्रसाद यादव यांच्या तीन कन्या आणि आरजेडीच्या अन्य नेत्यांच्या मालमत्ता असलेल्या परिसरात ईडीने टाकलेल्या धाडींमध्ये घबाड सापडले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीने नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्या प्रकरणी शुक्रवारी बिहारमधील अनेक शहरांमध्ये आणि इतर ठिकाणी जोरदार धाडी टाकल्या. या धाडी लालूप्रसाद यादव यांच्या तीन कन्या आणि आरजेडीच्या अन्य नेत्यांच्या मालमत्ता असलेल्या परिसरातही टाकण्यात आल्या. ईडीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या धाडींमध्ये ५३ लाख रुपयांची रोकड, १९०० अमेरिकी डॉलर, जवळपास ५४० ग्रॅम सोने आणि सुमारे दीड किलोचे सोन्याचे दागिने असा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच दक्षिण दिल्लीमधील एका घरातही छापेमारी करण्यात आली. तिथे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उपस्थित होते.
हे घर दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये आहे. तसेच ते लाभार्थी कंपनी असलेल्या एके इंफोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे. तिचा या प्रकरणात समावेश आहे. मात्र ईडीच्या म्हणण्यानुसार या घराचा यादव कुटुंबीय रहिवासी मालमत्ता म्हणून वापर करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे छापे पाटणा, फुलवारी शरीफ, दिल्ली-एनसीआर, रांची आणि मुंबई येथील लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रागिनी यादव, चंदा यादव आणि हेमा यादव यांच्या मालमत्तांवर आणि राजदचे माजी आमदार अबू दोजाना, अमित कत्याल, नवदीप सरदाना आणि प्रवीण जैन यांच्या निवासस्थानांवर मारण्यात आले.
दरम्यान, दावा करण्यात येत असलेला घोटाळा यूपीए सरकारच्या पहिल्या कार्यकाळात झाला होता. तेव्हा लालूप्रसाद यादव हे रेल्वे मंत्री होते. २००४ ते २००९ या काळात रेल्वेच्या विविध विभागामध्ये ड वर्गातील विविध व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. तसेच त्याच्या बदल्यात या व्यक्तींनी आपली जमीन तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्य आणि एके इंफोसिस्टम प्रा.लि.ला हस्तांतरीत करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रागिनी यादव आणि चंदा यादव एके इंफोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक होते. त्यांन कथितपणे एका उमेदवाराकडून कथितपणे भूखंड मिळाला होता.