"माझ्या वैयक्तिक आयुष्याचा मुद्दा बनवला जातोय...", समितीसमोर महुआ मोईत्रांनी आपली बाजू मांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:28 PM2023-11-02T15:28:09+5:302023-11-02T15:29:16+5:30
Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांनी आचार समितीसमोर दिलेल्या उत्तरात आपल्या वैयक्तिक आयुष्याचा मुद्दा बनवला जात असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदारमहुआ मोईत्रा यांनी आज संसदेच्या आचार समितीसमोर हजेरी लावली. यावेळी महुआ मोईत्रा यांनी आचार समितीसमोर आपली बाजू मांडली आहे. जवळपास दीड तास त्यांनी आचार समितीसमोर आपले म्हणणे मांडले. तसेच, आपल्यावरील आरोप फेटाळले आणि प्रत्युत्तर दिले. तसेच, आयटी, परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या अहवालांवर बैठकीत चर्चा झाली.
महुआ मोईत्रा यांनी आचार समितीसमोर दिलेल्या उत्तरात आपल्या वैयक्तिक आयुष्याचा मुद्दा बनवला जात असल्याचे म्हटले आहे. महुआ मोईत्रा म्हणाल्या, "मी काहीही चुकीचे केलेले नाही." तर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी महुआ मोईत्रा यांना सांगितले की, तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर येथे चर्चा होत नाही. तुम्ही तुमच्या संसदीय अधिकारांचा गैरवापर केल्याची चर्चा येथे होत आहे. तसेच, महुआ मोईत्रा यांनी त्या बदल्यात रोख रक्कम मिळाल्याचे आरोप फेटाळून लावले.
महुआ मोईत्रा यांच्या बाजूने विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, संसद पोर्टलचा वापर कसा करायचा हे माहीत नसलेल्या खासदारांची संख्या मोठी आहे. संसद पोर्टलवर खासदाराच्या खात्यात इतर कोणीही लॉग इन केल्यास, त्याचा ओटीपी खासदारांनाच येतो. महुआ मोईत्राच्या लॉगिनचे आयपी अॅड्रेस आणि त्यांचे लोकेशन एकच होते की नाही याची चौकशी केली जात आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे.
आरोप सिद्ध झाल्यास मोठी अडचण होणार?
जर महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर ते संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. ज्यामुळे महुआ मोईत्रा यांच्यासाठी संभाव्यतः मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. महुआ मोईत्रा यांचे म्हणणे आहे की, कथित गुन्हेगारीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आचार समिती योग्य मंच असू शकत नाही. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मागितली आहे.
काय आहे प्रकरण?
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली होती. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला होता. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनीही मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या 'प्रश्नांची उत्तरे' देण्यास तयार आहे, असे महुआ मोईत्रा यांनी सांगितले आहे.