१५५१ कोटी रुपयांची रोकड, अमली पदार्थ जप्त, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:22 AM2019-04-05T08:22:54+5:302019-04-05T08:23:24+5:30
निवडणूक आयोगाची कारवाई; सोन्याचांदीच्या वस्तूही हस्तगत, महाराष्ट्रात सर्वाधिक दारु हस्तगत
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने देशभरात आतापर्यंत बेहिशेबी रोकड, अवैध दारु, अंमली पदार्थ, सोने-चांदीच्या वस्तू असा सुमारे १५५१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक १९ लाख लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या गोष्टींचा वापर मतदारांना आमिष दाखविण्यासाठी करण्यात येणार होता, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाने ३७७ कोटी रुपयांची रोकड, १५७ कोटी रुपये किमतीची दारू, ७०५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ७८ लाख लिटर पेट्रोल, ३१२ कोटी रुपयांच्या सोने-चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
मतदारांना पैसे किंवा अन्य भेटवस्तू देऊन आपल्या बाजूने वळविण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे आयोगाने ठरविले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत अशा प्रकारच्या २९९.९४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली होती. आतापर्यंत देशात तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त म्हणजे १२७.८४ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे.
२०१४च्या निवडणुकीत या राज्यातून फक्त १५.५६ कोटींची रोकड ताब्यात घेण्यात आली होती. मतदारांनी देण्यासाठी
तयार केलेल्या सोने-चांदीच्या वस्तू तामिळनाडूमधूनच हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पंजाबमधून ११६ कोटींचे अमली पदार्थ
देशात महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे १९ लाख लिटर अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातून ३१ हजार लीटर अवैध दारु ताब्यात घेण्यात आली होती. पंजाबमधून ११६ कोटींचे अंमली पदार्थ निवडणूक आयोगाने जप्त केले आहेत.