महिलांना ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर, जगन्नाथ मंदिरासाठी ५०० कोटी; ओडिशाच्या माझी सरकारच्या पहिल्या कॅबिनेटमधील निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 08:28 AM2024-06-13T08:28:04+5:302024-06-13T08:38:04+5:30
मंदिराशी संबंधित हे दोन्ही प्रस्ताव मंजूर तर झालेच पण मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे बुधवारी रात्रीच आपल्या मंत्रिमंडळासह पुरी येथे पोहोचले.
भुवनेश्वर : आदिवासी नेते, भाजपच्या तिकिटावर चार वेळा आमदारपदी निवडून आलेले मोहन चरण माझी यांना बुधवारी ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची राज्यपाल रघुबर दास यांनी शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह १५ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ओडिशाचे भाजप सरकार ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. बुधवारी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे गुरुवारी सकाळी पुन्हा उघडले जातील आणि ५०० कोटी रुपयांचा निधी उभारला जाईल, असा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मंदिराशी संबंधित हे दोन्ही प्रस्ताव मंजूर तर झालेच पण मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे बुधवारी रात्रीच आपल्या मंत्रिमंडळासह पुरी येथे पोहोचले. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचे आश्वासन दिले होते. कोरोनाच्या काळात हे दरवाजे बंद असल्याने भाविकांची अडचण होत होती. आता चारही दरवाज्यातून भाविकांना प्रवेश मिळणार असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी राज्य सचिवालय लोकसेवा भवन येथे त्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाशी संबंधित निर्णयांची माहिती दिली. तसेच, माझी सरकारने शेतकरी आणि महिलांशी संबंधित निर्णयही घेतले. यावेळी मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले, राज्य सरकारने पुरी जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे सकाळी सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. चारही दरवाजातून भाविकांना मंदिरात प्रवेश मिळेल.
नवीन सरकारने शेतकरी आणि महिलांसाठी कोणते निर्णय घेतले?
याचबरोबर, धानाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ३१०० रुपये करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार असून संबंधित विभागाला यासंदर्भात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच समिती स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर समस्यांना तोंड देण्यासाठी 'समृद्ध कृषक नीती योजना' करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागांना योग्य मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून रोडमॅप तयार करून तो शासनासमोर मांडण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत हे काम केले जाईल, असे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीत माझी सरकारने महिलांशी संबंधित निर्णय घेतले. यावेळी मुख्यमंत्री मोहन चरण माझी म्हणाले की, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याणासाठी मागील बीजेडी सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे नवीन सरकार १०० दिवसांच्या आत सुभद्रा योजना लागू करेल, ज्याअंतर्गत प्रत्येक महिलेला ५० हजार रुपयांचे कॅश व्हाउचर दिले जाईल. सुभद्रा योजनेच्या अंमलबजावणीसाठी विभागांना मार्गदर्शक तत्त्वे आणि रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे.