जातनिहाय जनगणना केंद्र सरकारकडून अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 07:14 AM2022-05-26T07:14:57+5:302022-05-26T07:18:29+5:30
शरद पवार यांची भाजपवर टीका, ओबीसी आरक्षण मार्गी लावूनच निवडणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा. यासाठी जातनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपसोबत असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. पण केंद्रातील हे सरकार असेपर्यंत हे होईल, असे मला वाटत नाही. कारण ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांची मानसिकताच वेगळी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर तोफ डागली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलची बुधवारी बैठक झाली. त्यावेळी पवार म्हणाले की, आज भाजपचे लोक काहीही बोलत असले तरी त्यांच्या मनातली मळमळ स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत एखादा समाज सन्मानाने उभा राहात नाही, तोपर्यंत सवलती देण्याची गरज आहे. ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करूनच टाका, म्हणजे या देशाला नेमकी संख्या कळेल. मग त्या संख्येप्रमाणे न्यायाची वाटणी करा. इथे कुणी फुकट काही मागत नाही.
आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणूक
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लावूनच निवडणुकांना सामोरे जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने राज्य सरकारमध्ये घेतली आहे. ओबीसींना त्यांचे प्रतिनिधित्व देऊनच सत्तेचा कारभार चालवेल. तसेच हे फक्त महाराष्ट्रापुरते करून चालणार नाही, तर संपूर्ण देशात ओबीसींना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.
फडणवीस, तुम्ही झोपला होता का?
भाजपकडून ओबीसींना न्याय मिळण्याची शक्यता नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, महाविकास आघाडीने धोका दिला. पण पाच वर्षे केंद्र व राज्यात सत्ता असताना तुम्ही झोपला होता का? आमच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
- शरद पवार