बिहारमध्ये होणार जातीनिहाय जनगणना; गणनेसाठी वेळेची मर्यादा घालणार, बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 06:36 AM2022-06-02T06:36:11+5:302022-06-02T06:36:19+5:30
सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याचा मार्ग मोकळा झाला. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच प्रस्ताव मांडला जाईल, असे नितीशकुमार यांनी सांगितले. जातीनिहाय जनगणना करण्यासाठी वेळेची मर्यादा घातली जाणार आहे. सर्व पक्षांनी एकमताने या निर्णयास पाठिंबा दिला.
विधानसभेत ९ राजकीय पक्ष आहेत. त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व धर्मांची जातीय जनगणना होईल. जातींबरोबरच उपजातींचीही गणना होईल. या बैठकीला मुख्यमंत्र्यांबरोबरच भाजपचे उपमुख्यमंत्री तारकेश्वर प्रसाद, राजदचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव व खा. मनोज झा, एआयएमआयएमचे अख्तरूल ईमान, काँग्रेसचे आ. अजित शर्मा, मालेचे आ. महबूब आलम उपस्थित होते.
आधी सर्वांना प्रशिक्षण दिले जाणार
सर्व पक्ष व विरोधकांशी चर्चा झाल्यानंतर सर्वसंमतीने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करावे लागेल. जातीनिहाय जनगणना करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागेल. त्यांना आधी प्रशिक्षण दिले जाईल. जे काही होईल ते सार्वजनिकरीत्या होईल. सर्वांना याची माहिती व्हायला हवी. यासाठी पैशाची गरज पडेल व त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी दिली जाईल. - नितीशकुमार