जातीवाद देशाला लागलेला 'कलंक', चिमुकल्याच्या मृत्युने मीरा कुमार हळहळल्या; सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:34 PM2022-08-16T16:34:22+5:302022-08-16T16:38:50+5:30
राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती
नवी दिल्ली - देशातील बड्या नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी दलित मुलाच्या हत्याकांडावर भाष्य करताना त्यांच्या बालपणीची आठवण सांगितली आहे. त्यांच्या लहानपणीचा काळ अतिशय भयानक होता, याचीच जाणीव त्यांनी करुन दिली. तसेच, आजही काळ बदलला नसून देशात जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं मीरा कुमार यांनी ट्विटरवरुन म्हटलं. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षातही जातीवाद हाच देशाला लागलेला कलंक आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती. या शिक्षकाने विद्यार्थ्याला एवढी जबर मारहाण केली की, त्यामध्ये मुलाच्या कानातून रक्तश्राव सुरू झाला आणि नस फाटली. नातेवाईकांनी लहानग्याला अखेर गुजरातमधील रुग्णालयात नेले. मात्र, चिमुकल्याने आपला जीव सोडला. या मुलाच्या उपचारासाठी नातेवाईक 25 दिवस भटकंती करत होते. मात्र, कोणीही नीट दखल घेतली नाही. विशेष म्हणजे आरोपी शिक्षकाकडूनही कुठलीही मदत मिळाली नाही.
या अस्पृश्य घटनेने देश हादरला असून राजस्थानमधील अशोक गेहलोत सरकारही या घटनेमुळे निशाण्यावर आली आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनीही या घटनेवरुन देशातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. बिहारमध्ये जन्मलेल्या मीरा कुमार 5 वेळा खासदार राहिल्या आहेत. त्या, केंद्रीयमंत्री आणि लोकसभेत देशाच्या पहिल्या महिला सभापती म्हणूनही कार्यरत होत्या. मीरा कुमार यांनी जालोरच्या घटनेवरुन एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी वडिलांची आठवण सांगितली.
100 वर्ष पहले मेरे पिताजी बाबू जगजीवन राम को स्कूल में सवर्णो के घड़े से पानी पीने से रोका गया था। किसी तरह उनकी जान बच गई।
— Meira Kumar (@meira_kumar) August 15, 2022
आज, इसी वजह से एक 9 वर्ष के #दलित बच्चे को मार दिया गया।
आज़ादी के 75 वर्षों के बाद भी #जातिवाद हमारा सबसे बड़ा शत्रु है। कलंक है।
100 वर्षांपूर्वी माझे वडिल जगजीवनराम यांनाही शाळेत सुवर्णांच्या डेऱ्यातील पाणी पिण्यापासून अडविण्यात आले होते. कसेतरी त्यांनी आपला जीव वाचवला. मात्र, आज याच कारणाने 9 वर्षीय दलित मुलाला ठार मारण्यात आले. देशाच्या 75 वर्षानंतरही जातीवाद हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे, कलंक आहे, असे मीरा कुमार यांनी म्हटलं आहे.