पावामुळे कर्करोग होण्याच्या शक्यतेने ग्राहकांमध्ये संभ्रम!

By admin | Published: May 26, 2016 02:01 AM2016-05-26T02:01:28+5:302016-05-26T02:01:28+5:30

बाजारात उपलब्ध असलेल्या स्लाईस्ड ब्रेड, बन, पिझ्झा ब्रेड आणि बर्गर ब्रेड या प्रकारच्या बहुसंख्य पावांमध्ये कर्करोग होण्याचे संभाव्य कारण ठरू शकणारे ‘पोटॅशियम ब्रोमेट’ हे घातक

Causes of cancer due to water, confusion among consumers! | पावामुळे कर्करोग होण्याच्या शक्यतेने ग्राहकांमध्ये संभ्रम!

पावामुळे कर्करोग होण्याच्या शक्यतेने ग्राहकांमध्ये संभ्रम!

Next

नवी दिल्ली: बाजारात उपलब्ध असलेल्या स्लाईस्ड ब्रेड, बन, पिझ्झा ब्रेड आणि बर्गर ब्रेड या प्रकारच्या बहुसंख्य पावांमध्ये कर्करोग होण्याचे संभाव्य कारण ठरू शकणारे ‘पोटॅशियम ब्रोमेट’ हे घातक रसायन आढळून आल्याच्या अहवालानंतर नित्यनेमाने पाव खाणाऱ्या देशभरातील ग्राहकांच्या मनात भययुक्त संभ्रम निर्माण झाला
आहे.
खास करून दिल्लीच्या ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हॉयर्नमेंट’ (सीएसई)च्या अहवालाच्या आधारे ‘फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (एफएसएसएआय) या अन्नपदार्थ उद्योगाच्या नियामक संस्थेने पाव उत्पादनात ‘पोटॅशियम ब्रोमेट’च्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयास केल्याने आपण जो पाव मिटक्या मारत निर्धोकपणे खातो ता यापुढे खावा की नाही, याविषयी ग्राहकवर्ग संभ्रमात पडला आहे. मात्र केंद्रीय सार्वजनिक आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी ग्राहकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करताना म्हटले आहे की, मंत्रालयाने ‘एफएसएसएआय’ला या विषयाची गांभीर्याने दखल घेण्यास आणि सखोल अभ्यास करून दोन आठवड्यांत साधक-बाधक अहवाल देण्यास सांगितले आहे. पावामधील ‘पोटॅशियम ब्रोमेट’चा वापर बंद करायचा की नाही यावर त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे नड्डा यांनी सांगितले.
‘सीएसई’च्या या अहवालाची दखल घेऊन ‘एफएसएसएआय’ने त्यावर विचार केला व ‘पोटॅशियम ब्रोमेट’च्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस आरोग्य मंत्रालयास केली आहे. ‘एफएसएसएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार अग्रवाल म्हणाले की, ही बंदी घालण्याचा अधिकार केंद्रीय आरोग्य मंत्रालयास आहे. त्यासाठी ‘पोटॅशियम ब्रोमेट’ला वापरयोग्य ‘फूड अ‍ॅडिटिव्हज्’च्या यादीतून वगळावे लागेल. तसे करण्याची शिफारस आम्ही केली आहे. मंत्रालयाकडून तशी अधिसूचना काढली जाणे अपेक्षित आहे.

‘सीएसई’ने राजधानी दिल्लीच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या अग्रगण्य ब्रँडच्या विविध प्रकारच्या पावांचे नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण केले. त्यात त्यांना सर्वसान्यपणे खाल्ल्या जाणाऱ्या ३८ प्रकारच्या ‘प्रि पॅकेज्ड’ पावांपैकी ८४ टक्के पावांमध्ये ‘पोटॅशियम ब्रोमेट’ आणि ‘पोटॅशियम आयोडेट’ हा दोन प्रकारची रसायने आढळून आली.
‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रीसर्च आॅन कॅन्सर (आयएआरसी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी केलेल्या संशोधनांचा दाखला देत ‘सीएसई’ने त्यांच्या अहवालात असा दावा केला की, ‘पोटॅशियम ब्रोमेट’ हे मानवांमध्ये कर्करोगाचे संभाव्य कारण ठरू शकते तर पोटॅशियम आयोडेटमुळे थायरॉईड ग्रंथींच्या कार्यावर विपरित परिणाम होतो.
हा अहवाल फक्त दिल्लीत
विकल्या जाणाऱ्या पावांसंबंधीचा असला तरी औद्योगिक पाव उत्पादकांची देशभरातील उत्पादन प्रक्रिया एकसमान असल्याने दिल्लीतील हे निष्कर्ष इतरत्रही लागू होणारे आहेत, असे मानले जात आहे.

गरज अधिक संशोधनाची
पावातील ‘पोटॅशियम ब्रोमेट’चा कर्करोगाशी थेट संबंध जोडणारे निर्विवाद निष्कर्ष अद्याप कोणीही काढलेले नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही तज्ज्ञांच्या मते पाव बनविताना त्यात ‘पोटॅशियम ब्रोमेट’ वापरले एवढ्यावरूनच तो पाव आरोग्यास हानीकारक ठरवून त्याज्य मानता येणार नाही. कारण पाव बेक करण्याच्या प्रक्रियेत ‘पोटॅशियम ब्रोमेट’चे ‘पोटॅशियम ब्रोमाईड’या निष्क्रिय आणि अहानीकारक घटकांत रुपांतरण होते.
पावात किती प्रमाणात ‘पोटॅशियम ब्रोमेट’ वापरले जाते, पाव किती उष्णतेत किती वेळ बेक केला जातो व त्यानंतर त्यांत किती ‘पोटॅशियम ब्रोमेट’ मूळ स्वरूपात कायम राहते, यावर त्याचे संभाव्य हानीकारक परिणाम अवलंबून असतात. केवळ पोटॅशियम ब्रोमेट’ वापरले म्हणून कोणताही पाव हानीकारक ठरत नाही. ‘एफएसएसएआय’ने
2011
मध्ये अधिसूचित केलेल्या मानकांनुसार पावामध्ये दर दहा लाख भागांमध्ये ५० भाग (पार्टं्स पर मिलियन) एवढ्या प्रमाणात ‘पोटॅशियम ब्रोमेट’ व ‘पोटॅशियम आयोडेट’ वापरणे वैध आहे. अन्य बेकरी उत्पादनांसाठी हे प्रमाण २० पीपीएम एवढे आहे.

पाव फुगण्यासाठी वापर
पोटॅशियम ब्रोमेट हे पोटॅशियम या मूलद्रव्याचे एक संयुग असून ते पांढऱ्या रंगाच्या स्फटिकांच्या किंवा भुकटीच्या स्वरूपात उपलब्ध असते. पावाचे पिठ फुगावे व पाव अधिक लुसलुशीत व्हावा यासाठी हे द्रव्य वापरले जाते. यामुळे पावाच्या पृष्ठभागावर एक प्रकारची लकाकीही येते. जेव्हापासून व्यापारी तत्वावर पाव तयार करणाऱ्या औद्योगिक बेकऱ्या सुरु झाल्या तेव्हापासून ‘पोटॅशियम ब्रोमेट’चा सर्रास वापर केला जात आहे.

वापरावर बंदी नाही : प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे ठराविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी किंवा ते वाढविण्यासाठी कायद्याने एकूण ११ हजार प्रकारच्या द्रव्यांचा ‘फूड अ‍ॅडिटिव्हज्’ म्हणून वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यात ‘पोटॅशियम ब्रोमेट’चाही समावेश आहे. मात्र भारतात बंंदी नाही. अमेरिकेतही बंदी नाही.

३८ प्रकारच्या
‘प्री पॅकेज्ड’ पावांपैकी
84%
पावांमध्ये ‘पोटॅशियम ब्रोमेट’ व ‘पोटॅशियम आयोडेट’ हा दोन प्रकारची रसायने आढळली.

तातडीने सखोल अभ्यास करून अहवाल देण्यास मी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, माझे मंत्रालय लवकरच सखोल अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध करेल.
- जे. पी. नड्डा,
केंद्रीय आरोग्यमंत्री

येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही या विषयावर आपसात चर्चा करू व नंतर ‘एफएसएसएआय’च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ. पावामध्ये ‘पोटॅशियम ब्रोमेट’चा ठराविक प्रमाणात वापर करण्यास परवानगी आहे व आम्ही त्यानुसारच वापर करत आहोत. त्यामुळे आम्ही कायदा गुंडाळून ठेवून काही करीत आहोत, असे बिलकूल नाही.
-रमेश मागो,
अध्यक्ष आॅल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन


पाव उत्पादक ग्राहकांच्या आरोग्यास हानीकारक अशा उत्पादन प्रक्रियांचा मुद्दाम अवलंब करीत असल्याचा गैरसमजकाही स्वयंसेवी संस्था मुद्दाम पसरवित आहेत. मॅग्गी नूडल्सच्या बाबतीतही असाच नाहक भयगंड निर्माण केला गेला. याचा उत्पादकांना अप्रतिष्ठा आणि मागणीत घट या स्वरूपात मोठा फटका बसणार असल्याने ‘एफएसएसएआय’ व आरोग्य मंत्रालयाने पावासंबंधीच्या या वादात लवकरात लवकर निर्णायक खुलासा करणे नितांत गरजेचे आहे.
- डी. एस. रावत, महासचिव, असोचेम

Web Title: Causes of cancer due to water, confusion among consumers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.