गोंधळी खासदारांचे वेतन कापा - मनोज तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:12 AM2018-03-22T01:12:08+5:302018-03-22T01:12:08+5:30
गदारोळामुळे सलग १३ दिवस संसदेत कसलेही कामकाज न झाल्याने, भाजपाचे सदस्य मनोज तिवारी यांनी, गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा म्हणून त्यांचे वेतन कापून घेण्यात यावे, असे पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले आहे.
नवी दिल्ली : गदारोळामुळे सलग १३ दिवस संसदेत कसलेही कामकाज न झाल्याने, भाजपाचे सदस्य मनोज तिवारी यांनी, गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा म्हणून त्यांचे वेतन कापून घेण्यात यावे, असे पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले आहे. याची तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) खासदाराने ‘चोराच्या उलट्या बोंबा’असे म्हणत खिल्ली उडविली आहे.
खा. मनोज तिवारी यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींचे वर्तन पाहून मला दु:ख होत आहे. कायदे तयार करण्याची जबाबदारी असणारेच यापासून पळ काढत आहेत. संसदेत कोणतेही भरीव काम न करणाºया खासदारांचे ‘काम नाही तर वेतन नाही’ या तत्वाने मानधन कापले जावे.
टीआरएसच्या खासदार के. कविता यांनी मात्र या मागणीची खिल्ली उडविली आहे. कविता म्हणाल्या की, सरकारने नीट काम केल्यास खासदारांना निदर्शनाची वेळ येणार नाही. हे पत्र म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असा प्रकार आहे. मागण्यांवर तोडगा काढल्यास कुणीही सभागृहात निदर्शने करणार नाही.
टीआरएसच्या भूमिकेबाबत संशय
टीआरएसच्या या भूमिकेमुळे आता संशय निर्माण झाला आहे. मोदी सरकारविरोधात तेलगू देसम व व्हायएसआर काँग्रेसने आणणलेल्या अविश्वास ठरावावेळी टीआरएसने तटस्थ राहत सरकारला छुपा पाठिंब्याचे संकेत दिले होते. अविश्वास ठराव दाखल करण्यात आला, तेव्हाही टीआरएसच्या खासदारांनी तेलंगणामध्ये जादा आरक्षणाच्या मागणीसाठी गोंधळ घातला होता. ठराव दाखल होताच अण्णा द्रमुकनेही कामकाज बंद पाडण्यात पुढाकार घेतला. ठरावाला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डाव्यांनी पाठिंबा दिला आहे. टीआरएस व अण्णा द्रमुक हे सरकारच्या इशाºयावरूनच गोंधळ घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.