इफ्फीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, पणजीत दोन जागा वगळता अन्यत्र आंदोलनांना बंदी, आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 07:55 PM2017-11-16T19:55:09+5:302017-11-16T19:55:29+5:30
पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत तरी फक्त कांपाल परेड मैदान आणि आझाद मैदान अशा दोनच ठिकाणी धरणे, निषेध मोर्चासारखे आंदोलनात्मक उपक्रम करावेत, अन्यत्र केल्यास ते आंदोलन बेकायदा मानून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करणारा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी निला मोहनन यांनी गुरुवारी जारी केला आहे.
पणजी : गोव्यात आता सेंट झेवियर महोत्सव आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारखे (इफ्फी)सोहळे होणार आहेत. त्यामुळे पणजी पोलीस स्थानकाच्या हद्दीत तरी फक्त कांपाल परेड मैदान आणि आझाद मैदान अशा दोनच ठिकाणी धरणे, निषेध मोर्चासारखे आंदोलनात्मक उपक्रम करावेत, अन्यत्र केल्यास ते आंदोलन बेकायदा मानून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करणारा आदेश उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी निला मोहनन यांनी गुरुवारी जारी केला आहे.
येत्या दि. 20 पासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. त्यानिमित्ताने पणजीत युद्धपातळीवर सगळी तयारी सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेसह सरकारच्या विविध यंत्रणा या कामामध्ये गुंतल्या आहेत. दुस-याबाजूने पणजीपासून जवळच असलेल्या जुनेगोवे येथे जगप्रसिद्ध सेंट झेवियर फेस्त साजरे होणार आहे. त्यानिमित्ताने नोव्हेंना म्हणजेच ख्रिस्ती धर्मींय बांधवांच्या प्रार्थनांना येत्या दि. 23 पासून आरंभ होणार आहे. जगभरातून भाविक या फेस्तासाठी येतात. डिसेंबरमध्ये तर फेस्तानिमित्त लाखोंची गर्दी होत असते. शिवाय त्यावेळी नाताळाचीही धूम असते. राज्यात पर्यटनाचाही मोसम सुरू आहे. मोठय़ा प्रमाणात वाहने पणजीत फिरतात. अशावेळी पणजीत कुठेही जर मोर्चे, धरणो आणि अन्य आंदोलने झाली तर, पणजीतील वाहतुकीचा फज्जा उडेल तसेच अन्य समस्या निर्माण होऊ शकतात हे लक्षात घेऊन पणजी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील दोन जागा आंदोलनांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. विविध निमसरकारी संस्था (एनजीओ) आणि अन्य संघटनांनी जिल्हाधिका:यांच्या या आदेशाची नोंद घ्यावी असे सरकारला अपेक्षित आहे.
पणजीत एरव्ही कदंब बस स्थानकाकडील सर्कल, बंदर कप्तान खात्याकडील जेटी, मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानाबाहेर, वाहतूक खाते असलेल्या जुन्ता हाऊसकडे व अन्य काही ठिकाणी आंदोलने होत असतात. अलिकडेच बांधकाम खात्याच्या मजुर सोसायटीच्या कर्मचा-यांचा मोर्चा आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आला होता. तसेच पॅरा शिक्षिकांनी भाजपच्या येथील कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले होते. आता अशा ठिकाणी आंदोलने करता येणार नाहीत. कांपाल परेड मैदान व आझाद मैदानावर आंदोलन करण्यापूर्वी संबंधितांनी पूर्वपरवानगी घ्यावी हे जिल्हाधिका:यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. सरकारने आझाद मैदानाचे नुकतेच पूर्ण नूतनीकरण केले आहे.