सावधान: बाळाला लस टोचून घ्या, अन्यथा...; हा सर्व देशांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:38 AM2023-11-21T05:38:45+5:302023-11-21T05:40:53+5:30
सावधान : बाळाला लस टोचून घ्या, अन्यथा...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर कोट्यवधी मुलांचे लसीकरण होत नसल्याने २०२१-२२ पासून गोवर या आजाराने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या जागतिक स्तरावर ४३ टक्क्यांनी वाढली असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अमेरिकी डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन सेंटर (सीडीसी)ने सादर केला आहे. २०२२ मध्ये ३७ देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवरचा उद्रेक झाला होता, तर २०२१ मध्ये अशा देशांची संख्या २२ होती. अजूनही मुलांना लसीकरण होत नसल्याने गोवरचा उद्रेक वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भारतालाही मोठा धोका?
जगभरात गोवरच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील ३.३ कोटी मुले लसीकरणापासून वंचित राहिली. २.२ कोटी मुलांनी पहिला डोस, तर १.१ कोटी मुलांनी दुसरा डोस चुकवला. या संसर्गजन्य रोगाविरुद्ध पहिली लस न घेतलेल्या मुलांची संख्या सर्वाधिक असलेल्या टॉप १० देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
हा सर्व देशांना इशारा...
गोवरचा मृत्यूंमध्ये झालेली वाढ धक्कादायक आहे. गोवरचा वाढता उद्रेक सर्व देशांना इशारा आहे. गोवरमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी तातडीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, असे सीडीसीच्या जॉन व्हर्टेफ्यूईले यांनी म्हटले.
९५% चे गोवर निर्मूलनासाठीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही डोस देण्यात जगातील एकाही देशाला यश आलेले नाही.
कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये धोका
nगेल्या वर्षी, ३७ देशांमध्ये गोवरचा उद्रेक झाला, त्यातील बहुतेक देश आफ्रिकेतील आहेत. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, गोवरमुळे मृत्यूचा धोका सर्वाधिक आहे. तेथे लसीकरण दर सर्वात कमी फक्त ६६ टक्के आहेत.
n२०२२ मध्ये गोवर लसीचा पहिला डोस चुकवलेली अर्ध्याहून अधिक मुले फक्त अंगोला, ब्राझील, काँगो, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, मादागास्कर, नायजेरिया, पाकिस्तान आणि फिलीपिन्स या दहा देशांमधील आहेत.