कावेरी पाणी वाटपामुळे 'तिच्या' लग्नावर संकट
By admin | Published: September 13, 2016 01:39 PM2016-09-13T13:39:25+5:302016-09-13T13:39:25+5:30
अपवादात्मक परिस्थितीत एखादी कौटुंबिक दुर्घटना किंवा कायदा-सुव्यवस्थेमुळे विवाह सोहळयाच्या उत्साहावर विरजण पडते. बंगळुरुमध्ये रहाणा-या प्रेमालाही सध्या अशाच अनुभवातून जावे लागत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १३ - विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो पण अपवादात्मक परिस्थितीत एखादी कौटुंबिक दुर्घटना किंवा कायदा-सुव्यवस्थेमुळे विवाह सोहळयाच्या उत्साहावर विरजण पडते. बंगळुरुमध्ये रहाणा-या प्रेमालाही सध्या अशाच अनुभवातून जावे लागत आहे.
कावेरी पाणी वाटपावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे प्रेमाला मंगळवारी बंगळुरुमध्ये वाहनाच्या शोधात अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागली. प्रेमाचा तामिळनाडूतील युवकाशी बुधवारी विवाह होणार आहे.
नववधूच्या वेशात नटलेली प्रेमा आणि तिचे कुटुंबिय विवाहस्थळी पोहोचण्यासाठी वाहनाच्या शोधात फिरत होते. बंगळुरुमध्ये सोमवारी अनेक बसेस पेटवून देण्यात आल्या. त्यामुळे बससेवा पूर्णपणे बंद असून, कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात परस्परांच्या वाहनांना तूर्तास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
प्रेमाचे विवाहस्थळ तामिळनाडूमध्ये आहे. त्यामुळे प्रेमा आणि तिच्या कुटुंबाला कावेरी पाणी वाटप प्रश्नाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आमचा आनंद हरवला असून, आम्ही हा दिवस कधी विसरु शकत नाही अशी प्रतिक्रिया प्रेमाच्या कुटुंबियांनी दिली. आम्ही ६०० जणांना लग्नाचे निमंत्रण दिले होते पण आता लग्नाला फक्त २० जणच उपस्थित रहाणार आहेत असे निराश झालेल्या प्रेमाने सांगितले.