कावेरीचे पाणी पुन्हा पेटले, कर्नाटकात उत्स्फुर्त बंद
By admin | Published: September 9, 2016 04:15 PM2016-09-09T16:15:59+5:302016-09-09T16:20:31+5:30
कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज कर्नाटकात विविध संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे
Next
>-ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि.9- कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज कर्नाटकात विविध संघटनांनी राज्यव्यापी बंद पुकारला आहे. परिणामी शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शाळा, कार्यालये आणि जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने, मॉल्स पुर्णपणे बंद करण्यात आली आहेत. विमानतळ आणि बस स्थानकांवरही प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली आहे.
बंगळुरूच्या सिनेमाघरांतून तामिळ चित्रपट उतरवण्यात आले असून येथे राहणारे तामिळ नागरीक सुरक्षा कारणास्तव चिंतेत आहेत. तर कर्नाटक केबल असोसिएशननेही बंदला पाठिंबा दर्शवत तामिळ चॅनल्सचं प्रक्षेपण बंद केलं आहे.
बंददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचीअतिरीक्त कुमक मागविण्यात आली आहे. कावेरीच्या पाण्याबाबात दुस-यांदा अशाप्रकारे बंद पुकारण्यात आला असून या बंदला विविध संस्था, संघटना आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे बंद यशस्वी झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडूमधील शेतक-यांची परिस्थिती सुधारण्यासाठी 10 दिवस कावेरी नदीतून 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कावेरीच्या पाण्याचा वाद आता आणखी चिघळत आहे.