मुंबईतल्या ज्वेलर्सला अटक करण्याची धमकी; लाच घेताना ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 05:13 PM2024-08-08T17:13:37+5:302024-08-08T17:14:05+5:30
सीबीआयने लाच घेणाऱ्या ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला दिल्लीत रंगेहाथ पकडलं आहे.
Crime News : देशभरातली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवायांमुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणलेले असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. सीबीआने यईडीच्या सहाय्यक संचालकाला मुंबईतील एका ज्वेलर्सकडून २० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. ईडी अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआला यासंदर्भात माहिती दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने ३ आणि ३ ऑगस्ट रोजी मुंबईतील एका ज्वेलर्सच्या दुकानाची झडती घेतली होती. त्यानंतर ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यादव यांनी ज्वेलर्सच्या मुलाला २५ लाख रुपये दिले नाहीस तर अटक करु अशी धमकी दिली होती. ज्वेलरच्या मुलाने जास्त पैसे मागत असल्याचे सांगत ही रक्कम २० लाखांवर आणली. त्यानंतर संदीप सिंग यादवला लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, संदीप सिंग यादवने यापूर्वी सेंट्रल बोर्ड बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये काम केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यादवला गुरुवारी दिल्लीतील लाजपत नगर भागातून अटक करण्यात आली. सीबीआयला तक्रार प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता.
"मुंबईत ईडीने छापा टाकला होता आणि आरोपी व्यावसायिकाला अडकवण्याच्या धमकीवरून लाच घेण्याचा प्रयत्न करत होता. तक्रारीच्या आधारे, एफआयआर नोंदवण्यात आला आणि सापळा रचून अटक करण्यात आली," अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, आठ महिन्यांपूर्वीदेखील ईडीच्या मदुराई सब-झोनल ऑफिसमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती. डिसेंबर २०२३ मध्ये, तामिळनाडू दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने ईडी अधिकारी अंकित तिवारी याला एकूण ५१ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेपैकी २० लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडलं होतं. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अशाच एका प्रकरणात राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडी अधिकारी नवलकिशोर मीणाला त्याच्या वतीने काम करणाऱ्या एका मध्यस्थाला रंगेहाथ पकडल्यानंतर अटक केली होती.