सीबीआयने ‘अगुस्तावेस्टलॅण्ड’मध्ये काहींची नावे गोवण्यास सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:21 AM2019-03-06T04:21:14+5:302019-03-06T04:21:30+5:30
‘सीबीआयने मला दुबईत काही ठराविक व्यक्तींची नावे गोवण्यास सांगितली होती.
नवी दिल्ली : ‘सीबीआयने मला दुबईत काही ठराविक व्यक्तींची नावे गोवण्यास सांगितली होती. असे न केल्यास तुरुंगवासाला सामोरे जावे लागेल, असे धमकावलेही होते, असा खळबळजनक आरोप आगुस्ता वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर सौद्यातील घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या ख्रिश्चियन मिशेलने दिल्ली कोर्टात केला. भारतात प्रत्यार्पित होण्याआधी मला सीबीआयने उपरोक्त धमकी दिली होती, असा आरोप त्याने वकिलामार्फत कोर्टात केला.
पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर मिशेलला धोका होण्याची शक्यता आहे, असे तिहार तुरुंग प्रशासनाने कोर्टाला सांगितले. त्यावर विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी मिशेल याला अन्य कोठडीत हलविण्याचा आदेश तुरुंग अधीक्षकांना दिला. तो सध्या तिहार तुरुंगातील क्रमांक २ च्या कोठडीत आहे. दुबईहून प्रत्यार्पण झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला २ डिसेंबर रोजी अटक केली होती. सीबीआयच्या विशेष वकील डी.पी. सिंह यांनी मिशेलच्या उपरोक्त आरोपांचा इन्कार केला.
>वकील काय म्हणाले
सुनावणीदरम्यान मिशेलचे वकील अल्जो के. जोसेफ यांनी सांगितले की, सीबीआयचे अधिकारी मिशेल दुबईत भेटले. या प्रकरणात काही ठराविक व्यक्तींची नावे घेतली नाहीत किंवा अपेक्षित कबुली दिली नाही, तर तुरुंगावासाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी मिशेलला सांगितले. सुरक्षेच्या नावावरून त्याला वेगळे ठेवले जात आहे. त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. तथापि, सीबीआयने हे सर्व आरोप नाकारले. या आरोपांत जराही सत्यता नाही. दरदिवशी तो नवीन आरोप करीत आहे, असे सीबीआयच्या वकिलाने म्हटले आहे.