गृहमंत्री म्हणून ज्या कार्यालयाचे उदघाटन केले, तिथेच सीबीआयने चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 10:13 AM2019-08-22T10:13:19+5:302019-08-22T10:16:40+5:30
आयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली. एकेकाळी गृहमंत्री म्हणून जी संस्था चिदंबरम यांच्या आदेशान्वये काम करत असे, त्याच संस्थेने त्यांना अटक केली. इतकेच नव्हे तर दिल्लीतील सीबीआयच्या ज्या कार्यालयाचे उदघाटन चिदंबरम यांनी केले होते, त्याच कार्यालयात त्यांना बुधवारी रात्री आरोपी म्हणून आणण्यात आले. तसेच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
30 जून 2011 रोजी यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान सीबीआयच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर गृहमंत्री पी. चिदंबरम यांना खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, आता बरोब्बर आठ वर्षांनंतर त्याच सीबीआय कार्यालयात चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणण्यात आले. तसेच याच कार्यालयातील कोठडीत त्यांना रात्र काढावी लागली.
#WATCH ANI file footage: The then Union Home Minister, P Chidambaram at the inauguration of the new Central Bureau of Investigation (CBI) headquarters in Delhi on June 30, 2011. Chidambaram was arrested by CBI yesterday and brought to this complex. pic.twitter.com/ikuxIzaSyF
— ANI (@ANI) August 22, 2019
एएनआय या वृत्तसंस्थेने सीबीआय कार्यालाच्या उदघाटन समारंभाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी गृहमंत्री पी. चिदंबरम, कपिल सिब्बल वीरप्पा मोईली आदी नेते दिसत आहेत.
अजून एक योगायोगाची बाब म्हणजे पी. चिदंबरम हे गृहमंत्री असताना सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयने अमित शहा यांना अटक केली होती. आता सुमारे एका दशकानंतर अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. तसेच पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आहे.