सीबीआय खटले लटकले, ६,९०० प्रकरणे विविध न्यायालयांत आहेत प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:39 AM2024-09-03T06:39:04+5:302024-09-03T06:39:21+5:30

CBI News: सीबीआयकडे तपास असलेल्या ६,९००हून अधिक प्रकरणांचे खटले विविध न्यायालयांत प्रलंबित असून, त्यातील ३२० खटल्यांचा २० वर्षांहून जास्त काळ लोटला, पण अद्याप निकाल लागलेला नाही, असे केंद्रीय दक्षता आयोगाच्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. 

CBI cases are pending, 6,900 cases are pending in various courts | सीबीआय खटले लटकले, ६,९०० प्रकरणे विविध न्यायालयांत आहेत प्रलंबित

सीबीआय खटले लटकले, ६,९०० प्रकरणे विविध न्यायालयांत आहेत प्रलंबित

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सीबीआयकडे तपास असलेल्या ६,९००हून अधिक प्रकरणांचे खटले विविध न्यायालयांत प्रलंबित असून, त्यातील ३२० खटल्यांचा २० वर्षांहून जास्त काळ लोटला, पण अद्याप निकाल लागलेला नाही, असे केंद्रीय दक्षता आयोगाच्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. 

भ्रष्टाचाराच्या ६५८ प्रकरणांमध्ये सीबीआय चौकशी प्रलंबित असून, त्यातील ४८ प्रकरणे पाच वर्षांहून अधिक काळ रेंगाळली आहेत. सीबीआयकडे तपास असलेल्या ६,९०३ प्रकरणांच्या खटल्यांपैकी १,३७९ खटले हे तीन वर्षांहून कमी काळ, ८७५ खटले तीन वर्षांहून जास्त व पाच वर्षांहून अधिक, २,१८८ खटले पाच वर्षांहून जास्त व दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. २,४६१ खटल्यांचा १० वर्षांहून जास्त काळ लोटला, पण निकालच लागलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. 

१,६१० पदे सीबीआय यंत्रणेत रिक्त
सीबीआयमधील कर्मचाऱ्यांचे ७,२९५ इतके संख्याबळ असून, त्यातील १,६१० पदे रिक्त आहेत. ३१ डिसेंबर २०२३पर्यंतची ही स्थिती आहे. 
रिक्त पदांपैकी १,०४० ही एक्झिक्युटिव्ह दर्जाची असून, ८४ हे विधी अधिकारी, ५३ टेक्निकल ऑफिसर, ३८८ मंत्रालयांशी निगडित कर्मचारी, कॅंटीनमध्ये काम करणारे ४५ कर्मचारी आहेत. त्यांची पदे रिक्त आहेत. 

सीबीआयवर कामाचा मोठा बोजा
- गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर एक वर्षात सीबीआयने त्या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा, अशी अपेक्षा असते. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित न्यायालयात तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल करायचे असते. 
- सीबीआयकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, कामाचा मोठा भार, खटला चालवण्यास मंजुरी देण्यात विलंब इत्यादी कारणांमुळे अनेक प्रकरणांचा वेळेत तपास पूर्ण होत नाही. 

Web Title: CBI cases are pending, 6,900 cases are pending in various courts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.