Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांच्या घरावर, कार्यालयावर CBI चा छापा; जम्मू-काश्मीरमध्येही 30 ठिकाणी धाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:42 AM2024-02-22T10:42:02+5:302024-02-22T10:54:53+5:30
Satyapal Malik : किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवारी सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली.
जम्मू-काश्मीरच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवारी सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. याशिवाय केंद्रीय एजन्सीने जम्मू-काश्मीरमधील 30 ठिकाणी छापे टाकले आहेत.
सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते राज्याचे राज्यपाल असताना (त्यावेळी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला नव्हता) प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती.
CBI conducts raids at more than 30 places, including the premises of former Jammu and Kashmir Governor Satyapal Malik, as part of its investigation into alleged corruption linked to the awarding of a Kiru Hydroelectric project contract in the UT: Sources
— ANI (@ANI) February 22, 2024
मलिक 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. गेल्या महिन्यातही केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील सुमारे 8 ठिकाणी छापे टाकले होते.
सीबीआयने गेल्या महिन्यात टाकलेल्या छाप्यात 21 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम याव्यतिरिक्त डिजिटल उपकरणे, संगणक, मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली होती.
केंद्रीय एजन्सीने चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (प्रा.) लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. चौधरी हे जम्मू आणि काश्मीर केडरचे (आता AGMUT कॅडर) 1994 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.