व्हॉट्सअॅप आदेशाद्वारे केली सीबीआय संचालकांची गच्छंती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 06:23 AM2018-10-26T06:23:32+5:302018-10-26T06:28:04+5:30
सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना घरी बसवण्याचा आदेश मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ‘व्हॉट्सअॅप’वरून पाठविण्यात आला.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना घरी बसवण्याचा आदेश मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ‘व्हॉट्सअॅप’वरून पाठविण्यात आला. पंतप्रधानांकडील कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे अधिकारी त्या रात्री ११.५५ वाजता वर्मा यांच्या निवासस्थानी गेले. परंतु, सुरक्षारक्षकांनी ‘साहेब झोपले आहेत’, असे सांगून पत्र स्वीकारले नाही. त्यामुळे हा आदेश व्हॉट्सअॅपवरून पाठविण्यात आला.
वर्मा यांना आदेश पोहोचेपर्यंत नागेश्वर राव यांना संचालकपदाची सूत्रे स्वीकारणे शक्य नव्हते. शिवाय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि वर्मा यांच्या कार्यालयाची झडतीही घेता आली नसती. पंतप्रधान कार्यालयापासून ते राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपप्रधान सचिव पी.के. मिश्रा आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागातील अतिरिक्त सचिव लोक रंजन आपापल्या कार्यालयात सर्व काही मार्गी लागेल, अशी आशा बाळगून होते.
अजित डोवल यांनी लोक रंजन यांना व्हॉट्सअॅपवरून आदेश पाठविण्यास सांगितले. पण लोक रंजन यांच्याकडे तेव्हा मोबाइल फोन नसल्याने पीएमओने तो उपलब्ध करून दिला. आदेश पाठवल्यानंतर तो वर्मा यांनी वाचल्याची निळी खूण लोक रंजन यांनी पाहताच पुढच्या हालचालींना वेग आला.
त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली. आयबीच्या ८ अधिकाºयांच्या पथकाने सीबीआय मुख्यालय गाठून वर्मा आणि अस्थाना यांचे कार्यालय ताब्यात घेतले. वर्मा यांच्या अकराव्या मजल्यावरील कार्यालयाची झडती घेतली. तोवर नागेश्वर राव यांना त्यांच्या कक्षात थांबण्यास सांगण्यात आले होते. आयबीच्या पथकाने वर्मा यांच्या कार्यालयातील संगणकाची हार्ड डिस्क ताब्यात घेतली. तेथील सर्व फायलींच्या फोटोकॉपी काढल्या. उपधीक्षक अजय बस्सी यांच्याकडील सर्व फायलींच्या फोटोकॉपी काढल्या. सह-संचालक ए. के. शर्मा यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. आयबीचे पथक तेथून बाहेर पडेपर्यंत एकालाही तेथे येऊ दिले नाही.
आयबीचे पथक काय शोधत होते, यामागचे गूढ कळले नाही. राफेल सौद्याच्या चौकशीच्या मुद्द्याची सरकारला फारशी चिंता नव्हती. राफेलशी संबंधित दस्तावेज आलोक वर्मा यांनी ए. के. शर्मा यांच्याकडे पाठविले होते. हे दस्तावेज प्रशांत भूषण यांनी सीबीआयला दिले होते.
कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क ताब्यात घेतल्यावरून आयबीचे अधिकारी आणखी कशाचा तरी शोध घेत होते, हे निश्चित झाले. गुजरातच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी एस. के. शर्मा यांच्याकडील महत्त्वाचा विभाग काढून घेण्यात आला असा तरी त्यांना दिल्लीबाहेर पाठविालेले नाही, हे उल्लेखनीय. २७ वर्षांपासून राजीव गांधी हत्येप्रकरणी चौकशी करणाºया एमडीएमएचे प्रमुख म्हणून त्यांना कायम ठेवण्यात आले आहे. राकेश अस्थाना यांच्याऐवजी त्यांनी वर्मा यांची बाजू का घेतली, हे अद्याप गूढ आहे.
>आयबीच्या अधिकाºयांची पाळत
आलोक वर्मा यांना सक्तीने घरी बसवल्यानंतर आणि त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, वर्मां यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाळत ठेवून हेरगिरी करण्याचा प्रयत्न केंद्राकडून झाला, असे दिसते. हे नियमित काम आहे, असे अधिकारी सांगत असले तरी सीबीआय विरुद्ध सीबीआय संघर्षात आयबीच्या चार अधिकाºयांना ताब्यात घेण्यात आले.