सीबीआय विवाद : संचालक आलोक वर्मा यांनी अस्थानांचे आरोप नाकारले; आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 10:12 AM2018-12-07T10:12:39+5:302018-12-07T10:13:22+5:30
अस्थाना आणि अन्य अधिकाऱ्यांवरील एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर आज दुपारी 2.15 वाजता सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी दाखल केलेले आरोप सीबीआयचे मुख्य संचालक आलोक वर्मा यांनी फेटाळले आहेत. याबाबतचा खुलासा त्यांनी दिल्ली पटियाला न्यायालयात दाखल केला असून अस्थाना आणि अन्य अधिकाऱ्यांवरील एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर आज दुपारी 2.15 वाजता सुनावणी होणार आहे.
वर्मा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, अस्थाना यांनी केलेले आरोप हे केवळ कल्पीत आहेत. अस्थाना यांनी दाखल केलेली याचिका ही सुनावणीजोगी नाही आणि चुकीची आहे. कारण तपास अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. अस्थाना यांच्याविरोधातील तक्रार गंभीर स्वरुपाची असून अधिक चौकशीची गरज आहे.
राकेश अस्थाना यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर आहेत. अस्थाना एका प्रतिष्ठित आणि महत्वाच्या संस्थेमध्ये मोठ्या पदावर होते. भ्रष्टाचारामुळे संस्था बदनाम झाली आहे. यामुळे त्यांच्याविरोधातील कारवाई आणि तपास व्यवस्थित झाला पाहिजे, जेणेकरून लोकांचा सीबीआयवरचा विश्वास कायम राहील, असेही वर्मा यांनी म्हटले आहे.