दलालाला लाच दिल्याचे पुरावे असूनही सीबीआय-ईडीने तपास केला नाही; फ्रेंच नियतकालिकाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:40 AM2021-11-09T08:40:08+5:302021-11-09T08:40:31+5:30
भारताने दसाॅल्ट एव्हिएशनकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठी करार केला असून त्यासाठी ५९ हजार काेटी रुपये माेजण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी फ्रान्सच्या ‘दसाॅल्ट एव्हिएशन’ने ७.५ दशलक्ष युराे (६५ काेटी रुपये) एवढी लाच दलालाला दिली हाेती. यासाठी कंपनीने खाेट्या पावत्या सादर केल्या हाेत्या. महत्त्वाचे म्हणजे, याबाबत माहिती असूनही सीबीआय आणि ईडी या भारतीय तपास संस्थांनी तपास केला नाही, असा खळबळजनक दावा फ्रान्समधील ‘मीडियापार्ट’ या ऑनलाइन नियतकालिकेने केला आहे.
भारताने दसाॅल्ट एव्हिएशनकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठी करार केला असून त्यासाठी ५९ हजार काेटी रुपये माेजण्यात येणार आहेत. या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आराेप फ्रान्सच्या नियतकालिकेने केला आहे. नियतकालिकेने दावा केला आहे की, हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी सुशेन गुप्ता नावाच्या दलालाला ६५ काेटी रुपये देण्यात आले हाेते. त्यासाठी बाेगस कंपन्या, संशयास्पद करार आणि बनावट पावत्यांचा वापर करण्यात आला. राफेल व्यवहारामध्ये भ्रष्टाचार आणि पक्षपाताच्या आराेपांच्या चाैकशीसाठी फ्रान्समध्ये एका न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली हाेती.
असे मिळाले हाेते पुरावे
ऑगस्टा-वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकाॅप्टर्स पुरवठा घाेटाळ्याच्या चाैकशीतून याप्रकरणाशी संबंधित गाेपनीय कागदपत्रे सीबीआय आणि ईडीच्या हाती लागली हाेती, असा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणात सुशेन गुप्तावर एका बाेगस कंपनीच्या माध्यमातून ऑगस्टा-वेस्टलँडकडून लाच घेतल्याचा आराेप आहे.