सोनाली फोगाट यांना PAनंच विष पाजलं, सीबीआयच्या आरोपत्रातून मोठा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 02:58 PM2022-11-22T14:58:44+5:302022-11-22T15:00:03+5:30
हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयने गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयने गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सोनाली यांचा गोव्यातील कर्लीज बारमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप होता. सोनाली यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने सोनाली फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्याविरोधात गोवा कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. यापूर्वी गोवा पोलीस सोनालीच्या हत्येचा तपास करत होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. ऑगस्ट महिन्यात हे प्रकरण घडलं होतं. सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर हत्येचा आरोप केला.
फोगाट कुटुंबीयांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी
सोनाली फोगटच्या कुटुंबीयांनी पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर यांच्यावर फोगाट यांना विष देऊन मारल्याचा आरोप केला होता. यासोबतच गोवा पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याचेही आरोप केला. सोनाली फोगटचा पुतण्या विकास सिंघमार यानं गोवा पोलिसांच्या तपासावर विश्वास नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्यावर एकप्रकारे राजकीय दबाव आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे. कुटुंबासोबतच हरियाणा सरकारनेही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर गोवा सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
सीबीआयनं केली सुधीर आणि सुखविंदर यांची चौकशी
सीबीआयने सोनाली फोगटचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांची कोलवाले कारागृहात चौकशी केली होती. सीबीआयने तपासादरम्यान गोवा पोलिसांनी तयार केलेल्या ५०० हून अधिक पानांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. इतकेच नाही तर CBI ने सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासोबत कर्लीज बारमध्ये सीन रिक्रिएट देखील केला.
गोव्यापासून हरियाणापर्यंत तपास
सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यावर या कर्लीज बारमध्ये सोनाली फोगटला ड्रग्ज दिल्याचा आरोप आहे. गोवा पोलीस आणि सीबीआय या दोघांनी या प्रकरणाचा गोव्यापासून हरियाणातील हिस्सार, रोहतक आणि गुरुग्रामपर्यंत तपास केला होता. या संपूर्ण तपासानंतर सीबीआयनं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे.