CBI FIR DTC Bus: केजरीवाल सरकार अडचणीत! 1000 बस खरेदी प्रकरणात घोटाळा, CBIने दाखल केली FIR
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 09:00 PM2022-08-21T21:00:25+5:302022-08-21T21:14:59+5:30
CBI FIR DTC Bus: दिल्ली परिवहन महामंडळाने 1 हजार बस खरेदी केल्या होत्या, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता.
नवी दिल्ली: दिल्लीतीलआप सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईनंतर आता सीबीआयने रविवारी दिल्ली सरकारच्या 1,000 बस खरेदी आणि देखभालीमध्ये अनियमितता असल्याच्या आरोपांसंदर्भात एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली सरकारने बस खरेदीतील भ्रष्टाचाराचे आरोप नाकारले होते आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सीबीआयचा वापर करून छळ केल्याचा आरोप केला होता.
CBI has already registered a preliminary enquiry (PE) over allegations of corruption in the procurement of 1,000 low-floor buses by Delhi Government: CBI Sources pic.twitter.com/JDDOgdIFIa
— ANI (@ANI) August 21, 2022
दिल्ली परिवहन महामंडळाने (DTC) बस खरेदीच्या वार्षिक देखभाल करारामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने केला होता. या वर्षी मार्चमध्ये दिल्ली विधानसभेत भाजपने हा मुद्दा उपस्थित केला होता. जूनमध्ये माजी लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल यांनी स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने एएमसीमध्ये प्रक्रियात्मक लूपहोल्स शोधून काढल्या होत्या आणि त्या दुरुस्त करण्याची शिफारस केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एलजीने हे प्रकरण गृह मंत्रालयाकडे विचारासाठी पाठवले आहे.
मद्य घोटाळ्यात मनीष सिसोदिया मुख्य आरोपी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. केजरीवालांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तपास यंत्रणांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावरही धाड टाकली होती. आता या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने या प्रकरणात एकूण 15 जणांना आरोपी केले आहे. त्यात मनीष सिसोदिया यांचा आरोपी क्रमांक एक असा उल्लेख करण्यात आला आहे.