सीबीआयच्या ४० ठिकाणी धाडी
By admin | Published: September 25, 2015 12:33 AM2015-09-25T00:33:23+5:302015-09-25T00:33:23+5:30
मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा प्रकरणाच्या तपासाला वेग देत केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) गुरुवारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील सुमारे ४० ठिकाणी धाडी घातल्या
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा प्रकरणाच्या तपासाला वेग देत केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) गुरुवारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील सुमारे ४० ठिकाणी धाडी घातल्या. यात या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार जगदीश सागर आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांचे माजी ओएसडी धनराज यादव राहात असलेल्या परिसरांचीही झाडझडती घेण्यात आली.
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळ, इंदूर, उज्जैन, रिवा, जबलपूर, लखनौ आणि अलाहाबादसह अनेक शहरांमध्ये शोध मोहीम राबविण्यात आली. ही कारवाई एखाद्या ठराविक प्रकरणाशी संबंधित नव्हती तर परीक्षांच्या आयोजनात झालेल्या गैरव्यवहाराच्या मोठ्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी होती.
धनराज यादव याच्या लखनौमधील निवासस्थानाशिवाय जगदीश सागर, मध्य प्रदेशचे माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा, भरत मिश्रा, विनोद भंडारी, सुधीर शर्मा, ओमप्रकाश शर्मा, नितीन महिंद्रा व इतर काहींच्या परिसरात या धाडी घालण्यात आल्या. सीबीआयच्या पथकाने व्यापमं कार्यालयाचीही झडती घेतली. सीबीआयने व्यापमं घोटाळ्याशी संबंधित १०५ च्या वर गुन्हे नोंदविले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सर्वोच्च न्यायालयाने तपास संस्थेला व्यापमं घोटाळ्यातील सर्व प्रकरणांचा तपास आपल्या हाती घेण्याचे निर्देश दिले होते. (वृत्तसंस्था)