घाईघाईत अंत्यसंस्कार, चुकीची माहिती अन्...; सीबीआयचे कोलकाता पोलिसांवर हादरवणारे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:52 PM2024-09-16T12:52:36+5:302024-09-16T12:56:51+5:30

कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पश्चिम बंगाल पोलिसांवर सीबीआयने गंभीर आरोप लावले आहेत

CBI has laid serious charges against the West Bengal Police in the Kolkata RG Kar hospital doctor case | घाईघाईत अंत्यसंस्कार, चुकीची माहिती अन्...; सीबीआयचे कोलकाता पोलिसांवर हादरवणारे आरोप

घाईघाईत अंत्यसंस्कार, चुकीची माहिती अन्...; सीबीआयचे कोलकाता पोलिसांवर हादरवणारे आरोप

Kolkata Doctor Murder Case : पश्चिम बंगालच्या राजधानीत महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि अत्याचार प्रकरणाने देशाला हादरवून सोडलं आहे. या प्रकरणानंतर देशभरातील डॉक्टरांसह जनता रस्त्यावर उतरली होती. पश्चिम बंगालमध्ये अद्यापही या प्रकणाच्या विरोधात डॉक्टरांचे आंदोलन सुरुच आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा सीबीआय सखोल तपास करत असून त्यातून रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता पश्चिम बंगाल पोलिसांवर सीबीआयने गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. बंगालमधील जनता या प्रकणाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरली होती. हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यापासून रोज नवे खुलासे केले जात आहेत. आरजी कार रुग्णालय प्रकरणात सीबीआयने पोलिसांवर गंभीर आरोप करत मोठा खुलासा केला.

सीबीआयच्या आरोपानुसार, कोलकाता पोलिस अधिकारी अभिजीत मंडल यांनी आरोपी संजय रॉयला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ३१ वर्षीय महिला डॉक्टरच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार केले. तसेच कोलकाता पोलिसांनी अनेक निष्काळजीपणा केल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कोलकाता पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी उशिरा पोहोचले. तर  सीबीआयने कोलकाता पोलिसांच्या या निष्काळजीपणाचा उल्लेख रिमांड नोटमध्ये केला आहे.

पोलिसांकडून चुकीच्या माहितीची नोंद

आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यासह ताला पोलीस ठाण्याचे प्रभारी मंडल यांना शनिवारी सीबीआयने अटक केली.  मंडल यांना ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०३ वाजता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या माजी प्राचार्यांकडून घटनेची माहिती मिळाली होती. मात्र ते त्वरित घटनास्थळी पोहोचले नाहीत. ताला पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असतानाही ते सकाळी अकरा वाजता तेथे पोहोचले. पोलिस रेकॉर्डमध्ये मंडलच्या डायरीच्या नोंदीमध्ये चुकीची माहिती होती, ज्यामध्ये सेमिनार रूममध्ये डॉक्टरचा मृतदेह बेशुद्धावस्थेत आढळून आल्याचा उल्लेख आहे. खरं तर पीडितेला आधीच रुग्णालयात नेण्यात आले होते त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मंडलने हॉस्पिटलचे अधिकारी आणि इतर अज्ञात लोकांसोबत कट रचून जाणूनबुजून डायरीच्या नोंदींमध्ये खोटी तथ्ये नोंदवली आहेत, असा आरोप सीबीआयने केला.

घाईघाईत पीडितेवर अंत्यसंस्कार

मंडल हे घटना स्थळ सुरक्षित आणि संरक्षित करण्यात अयशस्वी ठरले, ज्यामुळे लोकांना त्या ठिकाणी प्रवेश करण्याची परवानगी मिळाली आणि महत्त्वपूर्ण पुरावे गायब झाले. कोलकाता पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास १४ तास उशीर केल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले आहे. बंगाल नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्टच्या तरतुदींनुसार घटनेच्या ठिकाणाहून वस्तू काढून टाकणे, जैविक नमुने सील करणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यातही पोलीस प्रभारी मंडल अपयशी ठरले. तसेच कुटुंबीयांनी दुसऱ्या शवविच्छेदनाची मागणी करूनही मंडळाने घाईघाईने सोमवारी अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिल्याचा आरोप सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केला.
 

Web Title: CBI has laid serious charges against the West Bengal Police in the Kolkata RG Kar hospital doctor case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.