सर्वोच्च न्यायालयाचा ममतांना दणका, नारदा स्टिंगचा तपास करणार सीबीआय
By admin | Published: March 21, 2017 06:26 PM2017-03-21T18:26:17+5:302017-03-21T18:26:17+5:30
नारदा स्टिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला न्यायालयानं मंजुरी दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. नारदा स्टिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला न्यायालयानं मंजुरी दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानं तृणमूलच्या नेत्यांची एसआयटीच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
नारदा स्टिंगमध्ये तृणमूलचे नेते कॅमे-यासमोर पैसे घेताना दिसत होते. यानंतर कोलकाता उच्च न्यायालयानं नारदा स्टिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला तृणमूल काँग्रेसचे नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान तृणमूलच्या नेत्यांची याचिका फेटाळून लावली आहे. मात्र कोलकाता उच्च न्यायालयानं सीबीआयला 72 तासांच्या आत प्राथमिक चौकशीत निष्कर्ष काढण्याचे आदेश दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मुदत वाढवून एक महिन्यांची केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं महिन्याभराच्या आत चौकशीचा निष्कर्ष काढण्याचे निर्देश दिले आहेत.
कोलकाता पोलिसांद्वारे सुरू असलेली चौकशी थांबवून सीबीआय चौकशी करण्याचा कोर्टानं दिलेल्या निर्णयावर ममता बॅनर्जींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे स्टिंग ऑपरेशन भाजपानंच केल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. 2016च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी नारदा स्टिंग ऑपरेशन उघड झालं होतं. त्यात तृणमूलचे नेते लाच घेताना दिसत होते. नारदा स्टिंग ऑपरेशन आयफोनच्या मदतीनं करण्यात आल्याचंही कोर्टात सांगण्यात आलं आहे.