सीबीआयतर्फेच रणजीत सिन्हा प्रकरणाचा तपास
By admin | Published: January 24, 2017 12:57 AM2017-01-24T00:57:47+5:302017-01-24T00:57:47+5:30
सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांनी कोळसा खाणपट्टे वाटप गैरव्यवहारांशी संबंधित प्रकरणांच्या तपासांत
नवी दिल्ली : सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांनी कोळसा खाणपट्टे वाटप गैरव्यवहारांशी संबंधित प्रकरणांच्या तपासांत व खटल्यांमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला का, याचा तपास सीबीआयनेच करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
सिन्हा यांनी आरोपींच्या घरी भेटी घेतल्या होत्या. त्याची नोंद असलेले ‘लॉग बूक’ ‘कॉमन कॉज’ या स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिकेत न्यायालयात सादर केले होते. सिन्हा यांनी घेतलेल्या भेटींमुळे सीबीआयच्या तपासात हस्तक्षेप झाला का, याचा नि:पक्ष विशेष तपास पथक नेमून तपास केला जावा, असा अर्ज ‘कॉमन कॉज’ने केला होता.
न्या. मदन बी. लोकूर, न्या. कुरियन जोसेफ व न्या, ए. के. सिक्री यांच्या विशेष पीठाने आदेश देताना नमूद केले की, तपासासाठी नेमायच्या विशेष पथकात बाहेरच्या कोणाची नेमणूक करण्याची गरज आहे, असे आम्हाला वाटत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)