कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्यावर सीबीआयची लुकआऊट नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:18 AM2019-05-27T05:18:11+5:302019-05-27T05:18:21+5:30
पश्चिम बंगालमधील शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्यावर सीबीआयने लुकआऊट नोटिस बजावली आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीवकुमार यांच्यावर सीबीआयने लुकआऊट नोटिस बजावली आहे. त्यांना परदेशात जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. राजीवकुमार यांनी परदेशात जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखण्यात यावे व त्याबाबत सीबीआयला तत्काळ कळवावे अशा सूचना देशातील सर्व विमानतळ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. १९८९च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असलेले राजीवकुमार प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जातात. राजीवकुमार यांच्यावर शारदा चिट फंड व रोजवेली चिट फंड घोटाळ््याच्या तपासादरम्यान पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.
राजीवकुमार यांना २३ मे रोजी लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सीबीआयने स. न्यायालयाला सांगितले की, चौकशीत सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करणे आवश्यक आहे. तपास अधिकाऱ्यांनी चौकशीत विचारलेल्या प्रश्नांना ते उद्धटपणे उत्तरे देत आहेत. २५०० कोटी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ््यामध्ये गुंतलेल्या राजकीय व्यक्तींचे मोबाइल व लॅपटॉप परत देण्याचे आदेश त्यांनी विशेष तपास पथकाला दिले होते. हे मोबाइल व लॅपटॉप फोरेन्सिक तपासणीसाठीही पाठविण्यात आले नाही असे सीबीआयतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.
>ममता बॅनर्जी यांचे खास विश्वासू
राजीवकुमार यांच्यावरील कारवाई रास्त असून ती राजकीय हेतूने प्रेरित नसल्याची खात्री पटायला हवी असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले होते. त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण १७ मे रोजी न्यायालयाने काढून घेतले व पुढील कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले. त्यावर वकीलांच्या संपामुळे पश्चिम बंगालमधील न्यायालयांतील कामकाज ठप्प झाल्याने अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत वाढवून मिळावी अशी विनंती राजीवकुमार यांनी २० मे रोजी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. जानेवारीत राजीवकुमार यांच्या चौकशीसाठी कोलकाता येथील निवासस्थानी गेलेल्या सीबीआय पथकालाच स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राजीवकुमार यांच्या समर्थनासाठी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारच्या विरोधात धरणे धरले होते.