सीबीआयची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; ९१व्या इंटरपोल जागतिक परिषदेच्या यजमानपदाचा मान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:37 AM2022-10-07T05:37:09+5:302022-10-07T05:39:09+5:30

जागतिक पातळीवरील मोहिमांचे नेतृत्व पहिल्यांदाच सीबीआय करत आहे.

cbi move towards global leadership the honor of hosting the 91st interpol world conference | सीबीआयची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; ९१व्या इंटरपोल जागतिक परिषदेच्या यजमानपदाचा मान 

सीबीआयची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; ९१व्या इंटरपोल जागतिक परिषदेच्या यजमानपदाचा मान 

Next

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: सीबीआयने जगातील पोलीस यंत्रणांच्या नेतृत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. जागतिक पातळीवरील मोहिमांचे नेतृत्व पहिल्यांदाच सीबीआय करत आहे. आता १८ ते २२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान दिल्ली येथे इंटरपोलच्या ९१ व्या जागतिक महासभेचे आयोजनही सीबीआय करत आहे. 

भारतात १९९७ नंतर २५ वर्षांनी होणाऱ्या परिषदेत १९५ देशांचे पोलीस प्रमुख सहभागी होतील. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआय संचालक सुबोधकुमार जायस्वाल इंटरपोलमध्ये भारताचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात परिषद यशस्वी करण्यासाठी अनेक समित्या कार्यरत झाल्या आहेत. 

३० ऑगस्ट २०१९ रोजी इंटरपोलचे सरचिटणीस श्रीयुर्गन स्टॉक (लियॉन, फ्रान्स) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली होती.  या भेटीत शहा यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात २०२२ मध्ये इंटरपोल महासभा भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला.  सँटियागो (चिली) येथे इंटरपोलच्या महासभेत भारताच्या या प्रस्तावाला  प्रचंड बहुमत मिळाले. प्रगती मैदान येथे ही परिषद होणार आहे. 

सीबीआयच्या नेतृत्वात जागतिक कारवाई

चाइल्ड पोर्नोग्राफीविरुद्ध ऑपरेशन मेघचक्रमध्ये, सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या इंटरपोल युनिट्सच्या इनपूटवर २१  राज्यांमध्ये ५९ ठिकाणी छापे मारले. अवैध ड्रग्ज पेलर्सविरुद्ध ऑपरेशन गरुडमध्ये ६ हजार ६०० जणांची तपासणी करून १७५ जणांवर १२७ गुन्हे दाखल केले. सायबर आर्थिक गुन्ह्यांविरुद्ध ऑपरेशन चक्रमध्ये एफबीआय, कॅनेडियन आणि ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या समन्वयाने जगभरात ११५ ठिकाणांची झडती घेण्यात आली. भारतातील १६ राज्यांत ८७ ठिकाणी शोधमोहीम घेण्यात आली. इंटरपोलच्या हेरॉईनविरुद्ध ऑपरेशन लायन फिशमध्ये सीबीआयने सर्वाधिक ७५.३ किलो हेरॉईन जप्त केले.

१९२३ मध्ये इंटरपोल स्थापन 

भारत १९४९ पासून सदस्य
सध्या १९५ देश सदस्य
इंटरपोलमध्ये १७ डेटाबेस. ज्यात ९० दशलक्ष रेकॉर्ड्स.
इंटरपोल पोलिसांना त्यांचे कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक साधने पुरवते. 
इंटरपोल आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण आयोजित करते. तसेच तपासात सहभागी होते.
इंटरपोलचे स्वतःचे सुरक्षित इंटरनेट चॅनेल आहे. हे सदस्य देशांना उपलब्ध करून दिले जाते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cbi move towards global leadership the honor of hosting the 91st interpol world conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.