सीबीआय, ईडीला घाबरत नाही; आपण पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही- नितीशकुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 06:49 AM2022-08-13T06:49:18+5:302022-08-13T06:49:41+5:30
नितीशकुमार यांनी युतीमधील जुन्या सहकाऱ्यावर टीका केली.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : मी सीबीआय, ईडी कुणालाच घाबरत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला, तर जनताच त्यांना धडा शिकवेल, असा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावला आहे. त्याचबरोबर मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राखीपौर्णिमेनिमित्त ईको पार्कमध्ये त्यांनी झाडाला राखी बांधली. त्यानंतर नितीशकुमार यांनी युतीमधील जुन्या सहकाऱ्यावर टीका केली.
राज्याच्या हिस्सेदारीत केंद्र सरकार कपात करू शकते, असे सांगितले असता ते म्हणाले की, जे काही होईल ते जनतेच्या समोर आहे. देश संविधानाने चालतो. वेगवेगळ्या राज्यांचे कोणते अधिकार आहेत, हे सर्व निर्धारित आहे. यात कोणाला काही अडचण असल्याचे उत्तर द्यावे लागेल.यावेळी हात जोडून नितीशकुमार म्हणाले की, मी पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. सर्व पक्षांना एकत्र घेऊन चालणे माझे काम आहे. सर्व पक्ष मिळून काम करतील. बिहारमध्ये जंगलराज परतल्याच्या भाजपच्या टीकेवर ते म्हणाले की, माझ्याविरुद्ध कोणीही बोलतो आणि त्याला त्याच्या पक्षात फायदा होतो.
२०१४ मध्ये पंतप्रधान झालेले २०२४ मध्ये पुन्हा येतील का?
आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असे स्पष्ट करून नितीशकुमार म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट झाले पाहिजे. जे २०१४ मध्ये पंतप्रधान झाले होते, त्यांनी २०२४मध्ये पंतप्रधान होतील की नाही, याचा विचार केला पाहिजे. २०२४मध्ये नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्रिपद सोडून लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देतील, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. २०२४च्या निवडणुकीसाठी आपण संपूर्ण देशाचा दौरा करणार आहोत. यासाठी सर्व विरोधकांना एकजूट केले जाईल. काही जण विरोधी पक्ष संपल्याची चर्चा घडवून आणत आहेत; परंतु विरोधक संपणार नाहीत. आम्ही यापूर्वीही विरोधकांत होतो आणि पुढेही राहू, असे ते म्हणाले.
भाजप प्रादेशिक पक्षांना संपवत आहे
तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारचे लोक बिकाऊ नाही, टिकाऊ आहेत. कोणत्याही एजन्सीची भीती त्यांना दाखविली जाऊ शकत नाही. देशातील लोक महागाई आणि बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. मध्यप्रदेश, झारखंड आणि महाराष्ट्रात आम्ही पाहिले आहे की, जो घाबरतो त्यांना भीती दाखवा. यावरुन दिसले, की भाजप प्रादेशिक पक्षांना संपवू पाहत आहे.
तेजस्वींना झेड प्लस सुरक्षा का नाही?
काही लोक कोणता ना कोणता विषय उपस्थित करतात व समाजात संघर्ष निर्माण झाल्यावर त्याचा फायदा घेतात. हे योग्य नाही, असेही नितीशकुमार म्हणाले. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना झेड प्लस सुरक्षा का दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.