मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे, कधी आणि कशी पडली वादाची ठिणगी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:35 AM2019-02-04T07:35:37+5:302019-02-04T09:44:18+5:30
मोदी आणि ममता यांच्यातल्या संघर्षामागे गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी आहेत.
कोलकाता/नवी दिल्ली: शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं बंगालमध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या प्रकारानंतर ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे. तर कारवाईस अटकाव करण्यात आल्यानंतर सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. 2016 पासून हा संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील या संघर्षाची ठिणगी एका घोटाळ्यामुळे पडली. 2013 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. शारदा चिट फंड नावानं ओळखल्या जाणाऱ्या या घोटाळ्यात तृणमूलच्या अनेक नेत्यांची नावं समोर आली. सत्ताधाऱ्यांच्या आशीवार्दामुळेच हा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपानं अनेकदा केला. लोकसभा निवडणुकीत भाजपानं यावरुन वातावरण तापवलं. मात्र यानतंरही राज्यातील 42 पैकी 34 जागांवर तृणमूलचे उमेदवार विजयी झाले.
मोदी सरकारनं शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे सोपवली आणि मोदी विरुद्ध दिदी हा वाद आणखी पेटला. 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळच्या प्रचारादरम्यानही भाजपानं पुन्हा हे प्रकरण लावून धरलं. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या निवडणुकीत भाजपाच्या मतांमध्ये जवळपास 6.10 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागांमध्ये 27 नं वाढ झाली आणि त्यांनी 294 पैकी 211 खिशात घातल्या.
केंद्र सरकारविरोधात ममतांचे आंदोलन LIVE : मोदी-ममतांमध्ये आर-पारची लढाई; कोलकात्यात रात्रभर धरणं आंदोलन https://t.co/fYUWfKYK0u#MamataVsCBI
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 4, 2019
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अपयशी ठरलेल्या भाजपानं 2018 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड जोर लावला. या दरम्यान काही भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. या निवडणुकीतही तृणमूल सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपानं काँग्रेस आणि डाव्यांना मागे टाकलं. त्यामुळे राज्यात भाजपा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला. यानंतर या दोन पक्षांमधील वाद वाढतच गेला.
नव्या वर्षात मोदी विरुद्ध ममता या संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळाला. 19 जानेवारीला ममता बॅनर्जींनी विरोधकांच्या महारॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी व्यासपीठावर देशातील 20 पक्षांचे नेते उपस्थित होते. मोदी सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली आहे, अशी टीका त्या सभेत ममता यांनी केली. यानंतर पंतप्रधान मोदींची पश्चिम बंगालमध्ये सभा झाली. या सभेत मोदींनी ममतांना लक्ष्य केलं. 'दिदींना हिंसाचाराचा आधार का घ्यावा लागतोय, हे समोर उपस्थित असलेला हा जनसमुदाय पाहून माझ्या लक्षात येतंय. ही गर्दी माझ्यावर असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि त्याचीच दिदींना भीती वाटतेय,' अशी टीका मोदींनी केली.
मोदी विरुद्ध दिदी; जाणून घ्या कुठे पडली वादाची ठिणगी? https://t.co/VkLgelIXmb#MamataVsCBI#MamataBlocksCBI
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 4, 2019
मोदींनी शनिवारी (2 फेब्रुवारी) ममतांवर शरसंधान साधलं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शारदा चिट फंड प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचे अधिकारी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी आले. मात्र राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या कारवाईविरोधात ममता बॅनर्जींनी धरणं आंदोलन सुरू केलं. मोदी आणि शहांच्या इशाऱ्यावरुनच सीबीआयची कारवाई सुरू असल्याचा स्पष्ट आरोप ममतांनी आंदोलनादरम्यान केला.