आदित्य हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत
By admin | Published: May 17, 2016 04:47 AM2016-05-17T04:47:48+5:302016-05-17T04:47:48+5:30
आदित्य कुमार सचदेवा हत्याकांड प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केली.
गया : आदित्य कुमार सचदेवा हत्याकांड प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केली. आदित्यच्या पालकांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती आणि स्थानिक पोलिसांवर आमचा विश्वास नसल्याचे सांगितले होते. या प्रकरणात जनता दल (यू)च्या निलंबित आमदार मनोरमादेवी यादव यांचा मुलगा मुख्य आरोपी असल्याने चौकशी सीबीआयतर्फे व्हावी, असे पालकांचे म्हणणे होते.
ती मागणी मान्य करताना नितीशकुमार यांनी चौकशीचे काम सीबीआयकडे देत असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात मुख्य आरोपी रॉकी यादवचा चुलत भाऊ टेनी यादव याने सोमवारी न्यायालयात शरणागती पत्कारली. रॉकीने आदित्यवर गोळ्या झाडल्या, तेव्हा टेनी यादव त्याच्यासोबत होता.
रॉकीचा शोध घेताना पोलिसांना आमदार मनोरमादेवी यांच्या निवासस्थानी दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. बिहारमध्ये दारूबंदी असल्याने पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू करताच, त्या गायब झाल्या आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावरील निर्णय १९ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.
वाहन ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून गया जिल्ह्यात रामपूर ठाण्यांतर्गत ६ ते ७ मेदरम्यान वाद झाले होते. आदित्य याची गोळी मारून हत्या केल्याचा आरोप आहे. यातील आरोपी टेनी यादवने न्या. ओम सागर यांच्यासमोर शरणागती पत्करली. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.