जिल्हा मध्यवर्ती बँकेत आता सीबीआय तपासणी

By admin | Published: December 22, 2016 11:07 PM2016-12-22T23:07:42+5:302016-12-22T23:07:42+5:30

ठराविक काळातील व्यवहारांवर नजर : नाबार्डच्या तपासणीनंतरचे पुढचे पाऊल

CBI probe in district central bank now | जिल्हा मध्यवर्ती बँकेत आता सीबीआय तपासणी

जिल्हा मध्यवर्ती बँकेत आता सीबीआय तपासणी

Next

रत्नागिरी : नाबार्डने केलेल्या तपासणीनंतर आता ‘सीबीआय’च्या आर्थिक गुन्हे शाखेचे पथक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत तपासणीसाठी दाखल झाले आहे. १० ते १४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत जमा झालेल्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटांचे व्यवहार सीबीआयचे सहाजणांचे पथक तपासत आहे. नाबार्डने केलेल्या तपासणीनंतर आता सीबीआयचे पथक दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
८ नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर चलनातील पाचशे व हजारच्या नोटा राज्यातील जिल्हा बॅँकांमध्ये जमा करून घेण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांत राज्यातील अनेक बॅँकांमध्ये प्रत्येकी ५०० ते ७०० कोटी एवढे जुने चलन जमा करून घेण्यात आले होते. रत्नागिरी जिल्हा बॅँकेत पाच दिवसांत ९९ कोटी रुपयांचे जुने चलन जमा झाले होते. अवघ्या पाच दिवसांनंतर जुने चलन भरून घेण्यास रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकांना बंदी घातली. त्यामुळे जिल्हा बॅँकांचे व्यवहार विस्कळीत झाले होते.
नाबार्डकडून रत्नागिरी जिल्हा बॅँकेच्या १३ शाखांची तपासणी करण्यात आली होती. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या जुन्या चलनाबाबत नाबार्डच्या पथकाकडून चौकशी झाली. त्यानंतर गुरुवारपासून सीबीआयच्या पथकामार्फत तपासणी सुरू झाली आहे. रत्नागिरी शहरात जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाचा एक विभाग माळनाका येथील शाखेच्या इमारतीत आहे. त्याठिकाणी सीबीआच्या सहाजणांच्या पथकाकडून ही तपासणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. बॅँकेच्या संगणक यंत्रणेमार्फत झालेल्या व्यवहाराची तपासणी पथकाने केली. त्यावेळी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांनाही थांबवून ठेवण्यात आले होते. (प्रतिनिधी)
तपासणीतील पाच प्रमुख मुद्दे
१0 ते १३ नोव्हेंबर या काळात एकाच दिवशी एकाच खात्यात झालेला भरणा किती आहे, एकाच खात्यात ५0 हजार रुपयांपेक्षा अधिक भरणा झाला असलेली खाती कोणती, जुन्या नोटा जमा झालेली एकूणच खाती कोणती, त्रयस्थ व्यक्तीने रक्कम भरणा केली आहे अशी खाती कोणती, सस्पेंड करण्यात आलेल्या खात्यांवर झालेले व्यवहार, अशा प्रमुख मुद्द्यांवर ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पाच दिवसांत जमा झालेले ९९ कोटी अनेकांना अडचणीचे ठरणार असल्याची शक्यता आहे.

Web Title: CBI probe in district central bank now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.