मथुरेतील हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी - हेमामालिनी
By admin | Published: June 4, 2016 08:59 AM2016-06-04T08:59:42+5:302016-06-04T09:00:30+5:30
दोन पोलिसांसह २४ जणांचा बळी घेणा-या मथुरेतील हिंसाचाराची सीबीआय चौकशी केली पाहिजे अशी मागणी मथुरेतील भाजपाच्या खासदार हेमामालिनी यांनी केली
Next
>ऑनलाइन लोकमत
मथुरा, दि. ०४ - दोन पोलिसांसह २४ जणांचा बळी घेणा-या मथुरेतील हिंसाचाराची सीबीआय चौकशी केली पाहिजे अशी मागणी मथुरेतील भाजपाच्या खासदार हेमामालिनी यांनी केली आहे. अतिक्रमण हटवण्यास गेलेले पोलीस आणि कब्जा करणाऱ्या लोकांमध्ये गुरुवारी उडालेल्या भीषण चकमकीनंतर एकूण २४ जणांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला. याच पार्श्वभूमीमवर हेमामालिनी यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली.
' घटनास्थळावर सुमारे ३ हजार लोकांकडे शस्त्रास्त्र आढळली, प्रशासनाला याची पूर्वकल्पना नव्हती का? त्यांच्याकडे (या प्रकाराची) सर्व माहिती असतानाही ते ही घटना रोखण्यात वा सांभाळण्यात अपयशी ठरले' असा आरोप हेमामालिनी यांनी केला. ' अतिक्रमण हटवण्यासाठी राज्य सरकारने योग्य पावले उचलून कारवाई करायला हवी होती' असेही त्या म्हणाल्या.
जवाहरबाग परिसरात सुमारे ३ हजार लोकांनी २६० एकरापेक्षा जास्त भूखंडावर दोन वर्षांपासून अवैध कब्जा केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांचे पथक अतिक्रमणकर्त्यांना हटविण्यासाठी परिसराची पाहणी करण्यासाठी तेथे पोहोचले असता, अवैध कब्जा करणाऱ्यांनी पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक सुरू केली. त्यात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणेदार संतोष यादव यांचा मृत्यू झाला. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या आणि लाठीमार केला. पण आंदोलनकर्त्यांनी तेथे ठेवलेले गॅस सिलिंडर आणि दारूगोळ्याला आग लावली. त्यामुळे स्फोट झाले. या हिंसाचारात २२ दंगलखोर ठार झाले.