केजरीवाल यांची सीबीआय चौकशी; अण्णा हजारेंनी परखडपणे मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 10:15 PM2023-04-15T22:15:10+5:302023-04-15T22:31:06+5:30
अरविंद केजरीवास यांना सीबीआयची नोटीस आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली - सीबीआयने दारु घोटाळ्यात केजरीवालांना नोटीस पाठविल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या चार्जशीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीबीआयने मला बोलावले आहे आणि मी नक्की जाईन. जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही... भाजपने सीबीआयला मला अटक करण्याचे आदेश दिले असतील तर सीबीआय त्यांच्या सूचनांचे पालन करेल, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय चौकशीवर भाजपला लक्ष्य केलं आहे. याप्रकरणी, आता केजरीवाल यांचे गुरू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मौन सोडलं आहे.
अरविंद केजरीवास यांना सीबीआयची नोटीस आल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सीबीआयकडून चौकशीला बोलविणे म्हणजे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आखण्य़ात आला आहे. यामुळे आप झुकणार नाही, व केजरीवाल देखील झुकणार नाहीत. केजरीवालांनीच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला आहे. यामुळेच त्यांना गप्प करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे होऊ देणार नाही, असे आपच्या नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे. तर, याप्रकरणी अण्णा हजारे यांनीही आपली भूमिका मांडली आहे.
काहीतरी दोष दिसत असेल म्हणूनच चौकशी होत असेल, जर चूक केली असेल तर शिक्षा व्हायलाज पाहिजे, असे म्हणत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांचे कुठलंही समर्थन केलं नाही. मी यापूर्वीच पत्र लिहिलं होतं, दारुबाबतच का विचार करता, चांगल्या गोष्टींचा विचार करा, पैशासाठी काहीही करणं ठीक नाही. दारुने कुणाचं भलं केलंय, असं कधीच झालं नाही. त्यामुळे, आता चौकशी निघाली आहे, सीबीआयकडून तपास सुरू आहे. कोणी दोषी आढळलं तर कारवाई करायलाच पाहिजे, असे अण्णांनी दारु घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसंदर्भात विधान केलं आहे. तसेच, सिसोदियासारखा माणूस आज तुरुंगात आहे, याचं मला अतिशय दु:ख होत आहे, असेही अण्णांनी म्हटले.
सीबीआयला घाबरणारा नाही
सीबीआय व ईडीच्या धमक्यांना मी घाबरणारा नाही. मी वेगळ्या मातीचा आहे. या सर्वांचा मी सामना करण्यास तयार आहे. माझे शब्द कदाचित चुकीचे असतील परंतु तुमचे कर्म हे फुटके आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सत्य समोर येईल : भाजप
सीबीआयच्या चौकशीतून सत्य समोर येणार आहे. या सर्व घोटाळयामागे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा हात असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात होता. सीबीआयने दिलेल्यासमन्सने हा दावा योग्य होता, हे स्पष्ट झाल्याचे दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी म्हटले आहे.