बँक घोटाळ्यांप्रकरणी १५ राज्यांमध्ये छापे, सीबीआयची धाड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:32 AM2019-11-06T03:32:52+5:302019-11-06T03:32:59+5:30
सीबीआयची कारवाई : १६९ ठिकाणी धडकले अधिकारी
नवी दिल्ली : देशातील विविध बँक घोटाळ्यांच्या तपासाचा भाग म्हणून सीबीआयने मंगळवारी महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये छापे घातले. हे छापे एकाच वेळी १६९ ठिकाणी छापे घालण्यात आले, अशी माहिती सीबीआयतर्फे देण्यात आली. या छाप्यांबाबत सीबीआयने अतिशय गुप्तता पाळली होती.
एकूण ३५ बँक घोटाळ्यांची प्रकरणे सध्या सीबीआयपुढे तपासासाठी आली असून, या एकूण घोटाळ्यांतील रक्कम ७ हजार कोटी रुपये आहे. या सर्व प्रकरणांतच छापे घालण्याचा निर्णय सोमवारी सीबीआयच्या मुख्यालयामध्ये झाला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना रात्री माहिती देण्यात आली आणि आज सकाळी या सर्व १६९ ठिकाणी सीबीआयचे अधिकारी एकाच वेळी छापे घालण्यासाठी पोहोचले.
सीबीआयने या ३५ बँका कोण आहेत, हे घोटाळे नेमके कोणी केले आहेत, त्यात बँक अधिकारी सहभागी आहेत वा उद्योजकांनी ते केले आहेत, याची माहिती दिली नाही. तसेच आज छापे कोणत्या ठिकाणी घालण्यात आले, हेही सांगण्यात आले नाही. मात्र हे सारे घोटाळे राष्ट्रीकृत बँकांतील आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरयाणा, गुजरात, पंजाब, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, दिल्ली या राज्यांबरोबरच दादरा व नगरहवेली व चंदीगड येथे या धाडी घालण्यात आल्या.
एका वर्षात ६,८00 घोटाळे
देशात २0१८-१९ या वर्षांत झालेल्या बँक घोटाळ्यांची संख्या ६,८00 इतकी असून, त्यातील रक्कम ७१ हजार ५00 कोटी रुपये आहे. नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यानंतर केंद्र सरकार आणि सीबीआय यांनी अशा सर्व घोटाळ्यांचा तपास सुरू केला आहे.