हुड्डा यांच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:28 AM2019-01-26T05:28:35+5:302019-01-26T05:28:44+5:30
काँग्रेसचे नेते हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरावर तसेच हरियाणा, राजधानी चंदीगड तसेच गुरगाव, मोहाली तसेच दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील ३0 ठिकाणी छापे घातले.
चंदीगड : काँग्रेसचे नेते हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या घरावर तसेच हरियाणा, राजधानी चंदीगड तसेच गुरगाव, मोहाली तसेच दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील ३0 ठिकाणी छापे घातले. रोहतकमधील त्यांच्या निवासस्थानी छापा घातला, तेव्हा हुड्डा घरातच होते. सीबीआयची कारवाई सुरू असून घरातील कोणालाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. राजकीय हेतूनेच हे छापे घालण्यात येत असल्याचा आरोप स्वत: हुड्डा व काँग्रेसने केला आहे.
हरयाणातील जिंद विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी आज हुड्डा जाणार होते. त्याआधी हा छापा घालण्यात आला. त्यांना प्रचारास जाण्यापासून थांबवण्यासाठी छापा घातल्याचा आरोप करण्यात आला. मोदी सरकार सीबीआयचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी व विरोधकांना त्रास देण्यासाठी वापर करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनीही केली आहे.
असोसिएट जर्नल्स लिमिटेडला २00५ साली नियम धाब्यावर बसवून पंचकुला शहरात जमीनवाटप करण्यात आल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. (वृत्तसंस्था)
>हा तर आवाज दाबण्याचा प्रयत्न
माझ्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात सीबीआयला काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असा दावा भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केला. माझा आवाज दाबण्यासाठीच भाजपाने षडयंत्र आखल्याचा आरोपही त्यांनी केला.