सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी; २९ ठिकाणी झडती घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 06:52 AM2024-02-23T06:52:36+5:302024-02-23T06:53:18+5:30
झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख ठेवी, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक, विविध शहरांमधील मालमत्तांमध्ये गुंतवणूक, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे आदी जप्त करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
नवी दिल्ली : किरू जलविद्युत प्रकल्पातील कथित २२०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सीबीआयने गुरुवारी जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरासह अन्य २९ ठिकाणी झडती घेतली. जम्मू, श्रीनगर, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, बागपत, नोएडा, पाटणा, जयपूर, जोधपूर, बारमेर, नागौर व चंडीगडमधील ३० ठिकाणी सुसीबीआयने सकाळीच आपली कार्यवाही सुरू केली.
झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख ठेवी, मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक, विविध शहरांमधील मालमत्तांमध्ये गुंतवणूक, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे आदी जप्त करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. आर.के. पुरम, द्वारका आणि दिल्लीतील आशियाई क्रीडा ग्राम याशिवाय गुरुग्राम आणि बागपत येथील मलिक यांच्याशी संबंधित परिसरांची झडती घेण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आजारपणामुळे मी गेल्या ३-४ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. तरीही सरकारी यंत्रणांमार्फत छापा टाकून विनाकारण त्रास दिला जात आहे. त्यांना ४-५ कुर्ते आणि पायजाम्याशिवाय काहीही मिळणार नाही. मी या छाप्यांना घाबरणार नाही.
- सत्यपाल मलिक, माजी राज्यपाल