नीरव मोदीला अटक करण्याची सीबीआयची ब्रिटन, इंटरपोलकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:34 AM2019-03-11T04:34:07+5:302019-03-11T04:34:35+5:30
पंजाब नॅशनल बँकेचे १३५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये वास्तव्यास
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेचे १३५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये राहात असून त्याला अटक करावी अशी मागणी सीबीआयने इंटरपोल व ब्रिटनकडे केली आहे.
यासंदर्भात सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, नीरव मोदी हा ब्रिटनमधून पळून जाऊ नये याची दक्षता घ्यावी अशी विनंती इंटरपोलला करण्यात आली आहे. तो वेगळ्या नावाने अन्य देशांतही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नीरव ब्रिटनमध्येच असल्याची माहिती त्या देशाचे अधिकारी व इंटरपोलला सीबीआयने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच दिली होती. पण ब्रिटनमध्ये तो नेमका कुठे राहातो त्याची माहिती मिळत नव्हती. भारत, ब्रिटन, अमेरिकेत त्याच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यांबाबत वकीलांशी कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी नीरव मोदी वरचेवर युरोपीय देशांत जातो. गेल्या वर्षी त्याने फ्रान्स, हाँगकाँग, अमेरिका, बेल्जियम या देशांनाही भेटी दिल्या होत्या.
दरम्यान, नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्यात यावे अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटन, अमेरिका, इजिप्त या देशांना केली आहे. ब्रिटनमधील गृहमंत्रालयाने ही विनंती स्थानिक न्यायालयाकडे पाठवली असून तेच आता याबाबत निर्णय घेईल. नीरव लंडनमधील वेस्ट एंड भागातील आलिशान फ्लॅटमध्ये राहात आहे. त्याला व्यवसाय करण्याकरिता ब्रिटन सरकारने राष्ट्रीय विमा क्रमांकही दिला आहे.