NET पेपर लीक: तपासास गेलेल्या CBI पथकावर हल्ला, तोतया पोलीस समजून गावकऱ्यांची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 10:54 PM2024-06-23T22:54:01+5:302024-06-23T22:55:51+5:30
NET 2024 Paper Leak Case: याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, २०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
NET 2024 Paper Leak Case: यूजीसी नेट आणि नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला असून, दोन्ही परीक्षांमधील गोंधळाप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. UGC-NET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात एका संशयिताच्या मोबाइल लोकेशननुसार तपास करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला बिहारमधील नवादा येथील ग्रामस्थांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून सीबीआयचे एक पथक तपास करण्यासाठी बिहारमधील नवादा येथे पोहोचले. मात्र, तोतया पोलीस समजून ग्रामस्थांनी या पथकाला मारहाण केली. इतकेच नव्हे तर या पथकाच्या वाहनाची तोडफोडही करण्यात आली. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
UGC-NET ची १८ जून २०२४ रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द केल्यानंतर या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. या तपासादरम्यान एका संशयिताचे मोबाइल लोकेशन बिहारच्या नवादा जिल्ह्यातील कसियाडीह गावातील दाखवण्यात आले. या लोकेशनचा शोध घेत सीबीआयचे पथ तेथे पोहोचले. या तपास पथकात चार अधिकारी आणि महिला शिपाई होते. मात्र, काही गावकऱ्यांनी तोतया पोलीस असल्याचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले आणि एकाएकी ग्रामस्थांनी सीबीआय पथकातील अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. वाहनाची तोडफोड केली.
याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिक्षक अंबरीष राहुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यानुसार तपास सुरू आहे. सीबीआय पथकाने घटनास्थळावरून दोन मोबाइल जप्त केले आहेत. त्यामुळे आणखी काही जणांचा या प्रकणात समावेश असून, त्यांना अटक केली जाईल, असे सीबीआय पथकाचे म्हणणे आहे. सीबीआय तपास पथकाला झालेल्या मारहाणी प्रकरणी १५० ते २०० अज्ञातांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.