छोटा राजनच्या हद्दपारीसाठी सीबीआय पथक बालीला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2015 01:23 AM2015-10-30T01:23:16+5:302015-10-30T01:23:16+5:30
अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन याच्या हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाली येथे उच्चस्तरीय पथक पाठविण्याचा निर्णय केंद्रीय अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी घेतला.
नबिन सिन्हा, नवी दिल्ली
अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन याच्या हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बाली येथे उच्चस्तरीय पथक पाठविण्याचा निर्णय केंद्रीय अण्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी घेतला. छोटा राजनला रविवारी इंडोनेशियाच्या बाली बेटावर अटक करण्यात आली होती.
छोटा राजनला इंडोनेशियामधून भारतात हद्दपार करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आवश्यक असलेले विविध न्यायालयांमधील कायदेशीर दस्तऐवज आणि मुंबई पोलिसांकडील कागदपत्रांची जमवाजमव करण्याची प्रक्रिया सीबीआयतर्फे सुरू करण्यात आली आहे. शक्य तितक्या लवकर इंडोनेशियात दाखल होण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे. डॉन दाऊद इब्राहिमसोबत असलेल्या शत्रुत्वामुळे छोटा राजनच्या जीवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याची सीबीआयची योजना आहे, असे तपास संस्थेच्या सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा राजनवर हल्ला होण्याची भीती आणि आपल्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता छोटा राजनने तुरुंगात अधिक सुरक्षा मिळण्याची आणि भारतात सुरक्षितपणे पाठविण्याची मागणी केली आहे.