‘सीबीआय’चे घरातील भांडण पोहोचले दिल्लीच्या हायकोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:57 AM2018-10-24T05:57:40+5:302018-10-24T05:58:12+5:30
खोटे रेकॉर्ड तयार केल्याच्या आरोपावरून अटक केलेले उपअधीक्षक देवेंद्र कुमार दिल्ली उच्च न्यायालयात गेल्याने ‘सीबीआय’मधील वरिष्ठांचे अंतर्गत भांडण रंगण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली : मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेले विशेष संचालक राकेश अस्थाना व याच प्रकरणात खोटे रेकॉर्ड तयार केल्याच्या आरोपावरून अटक केलेले उपअधीक्षक देवेंद्र कुमार दिल्ली उच्च न्यायालयात गेल्याने ‘सीबीआय’मधील वरिष्ठांचे अंतर्गत भांडण रंगण्याची चिन्हे आहेत. त्यातच अस्थाना यांच्या मुलीच्या लग्नाचे प्रकरणही सीबीआयने उकरून काढले असून, त्यामुळे त्यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची चिन्हे आहेत.
अस्थाना व कुमार या दोघांनीही त्यांच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी स्वतंत्र याचिका केल्या. न्या. नझमी वझिरी यांच्यापुढे त्या सुनावणीसाठी आल्या. अस्थाना प्रकरणात आपल्याला सविस्तर अभ्यास सरावा लागेल, असे सांगून प्न्या. वझिरी यांनी सुनावणी २९ आॅक्टोबर रोजी ठेवली. तोपर्यंत अस्थाना यांच्यावरील गुन्ह्याच्या बाबतीत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवावी, असे निर्देश दिले.
कुमार यांना अटक झालीच असल्याने त्यांच्या याचिकेवर कोणताही अंतरिम आदेश दिला गेला नाही. मात्र ‘सीबीआय’ व संचालक आलोक वर्मा यांना नोटिस काढून पुढील सुनावणीपूर्वी उत्तर देण्यास सांगण्यात आले. पूर्वी अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये ‘सीबीआय’कडून काम पाहणारे ज्येष्ठ वकील अमरेंद्र सरन अस्थाना यांचे वकील आहेत.
कुरेशीच्या तपासासाठी नेमलेल्या ‘एसआयटी’चे अस्थाना प्रमुख व कुमार हे तपास अधिकारी आहेत. वर्मा यांच्यावर अस्थाना यांनी केलेल्या आरोपांना पाठबळ मिळावे म्हणून कुमार यांनी सतीश बाबू साना या व्यापाऱ्याची आधीची जबानी बदलून बनावट रेकॉर्ड तयार केले, असा आरोप आहे.
सात दिवसांची कोठडी
कुमार यांना मंगळवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष स्नेही मान यांच्यापुढे हजर करण्यात आले. कुमार यांच्या चौकशीसाठी त्यांची १० दिवसांची कोठडी ‘सीबीआय’ने मागितली. मात्र न्यायालयाने सात दिवसांचा रिमांड दिला.