CBIvsCBI: वर्मा-अस्थाना वाद; ताब्यात घेतलेले ७ मोबाईल गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:26 AM2018-11-02T04:26:49+5:302018-11-02T06:44:52+5:30
केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) विजनवासात पाठवण्यात आलेले संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयमधील दोन क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षाने आणखी वेगळे वळण घेतले आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) विजनवासात पाठवण्यात आलेले संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयमधील दोन क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षाने आणखी वेगळे वळण घेतले आहे. वर्मा व अस्थाना यांच्या होणाऱ्या चौकशीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असे सात मोबाईल फोन्स गूढरीत्या अदृश्य झाले आहेत. २२ आॅक्टोबर रोजी सीबीआयच्या विशेष तुकडीने सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थानी घातलेल्या छाप्यांत हे सात फोन्स ताब्यात घेण्यात आले होते.
चौकशीत हे स्पष्ट झाले की, देवेंद्र कुमार हे अस्थाना यांचे अत्यंत विश्वासू चौकशी अधिकारी होते व ते सगळी संवेदनशील प्रकरणे हाताळत होते. त्यातील एक फोन हा अस्थाना यांच्याशी बोलण्यासाठी होता, तर दुसरा आंतरराष्ट्रीय कामांसाठी. सीबीआयनुसार देवेंद्र कुमार यांचे टेलिफोन्स हे सीबीआयच्या तांत्रिक शाखेच्या निगराणीखाली होते. १५ व १६ आॅक्टोबर रोजी देवेंद्र कुमार व इतरांविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आलोक वर्मा यांच्या नियंत्रणाखाली ही तांत्रिक शाखा आली. फक्त एकच मोबाईल फोन जप्त केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. २२ आॅक्टोबर रोजी देवेंद्र कुमार यांना अटक केल्यावर सीबीआयने आठ मोबाईल जप्त केल्याचे म्हटले होते.
दोन आठवडे ‘जैसे थे’चे न्यायालयाचे आदेश
सक्तीच्या रजेवर पाठविलेले ‘सीबीआय’चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात आणखी दोन आठवडे ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी दिला. हा गुन्हा रद्द करावा यासाठी अस्थाना यांनी याचिका केली आहे. त्यावर प्रतिज्ञापत्र करून ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदण्याचे समर्थन केले. न्या. नजमी वझिरी यांनी यास उत्तर देण्यासाठी अस्थाना यांना वेळ देत आधी दिलेला ‘जैसे थे’ आदेश १४ नोव्हेंबरपर्यंत वाढविला.