CBSE 10th Result 2018: सीबीएसई दहावीतही विद्यार्थिनींचीच बाजी; अव्वल चौघांमध्ये तीन मुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:06 AM2018-05-30T06:06:53+5:302018-05-30T06:06:53+5:30
प्रखर मित्तल, रिमझिम अग्रवाल, नंदिनी गर्ग श्रीलक्ष्मी यांनी मिळविले ५00 पैकी ४९९ गुण
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात, सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. या परीक्षेत ८६.७0 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला १६ लाख ८ हजार ६९४ विद्यार्थी बसले होते.
या वर्षी सीबीएसईच्या दहावी व बारावी या दोन्ही परीक्षांना मिळून २८ लाखांवर विद्यार्थी बसले होते. बारावीचा निकाल या आधीच लागला आहे. यंदा या दोन्ही परीक्षांच्या काही प्रश्नपत्रिका फुटल्याने वाद निर्माण झाला होता. बारावीच्या अर्थशास्त्र विभागाची परीक्षा पुन्हा घेण्यात आली, तर दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा केवळ दिल्ली व हरयाणामध्येच झाली.
परीक्षेत जवाहन नवोदय विद्यालयातील ९७.३१ विद्यार्थी, तर केंद्रीय विद्यालयातील ९५.९६ विद्यार्थी पास झाले. खासगी शाळांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८९.४९ टक्के असून, सेंट्रल तिबेटिअन स्कूल अॅडमिनिस्ट्रेशन (सीटीएसए)मधील ८६.९७ विद्यार्थी पास झाले. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या सरकारी शाळांचा निकाल ६३.९७ टक्के आहे आणि सरकारी अनुदान मिळणाऱ्या शाळांमधील ७३.४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
टेन्शन घेऊ नका
अभ्यासाचे टेन्शन घेऊन काहीच होत नाही. कोणताही दबाव न घेता मन लावून अभ्यास करायला हवो. मी तेच केले.
- नंदिनी गर्ग, उत्तर प्रदेश
स्टार्ट टू एंड
सुरुवातीपासून अभ्यास करायला हवा, म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळी टेन्शन येत नाही.
- श्रीलक्ष्मी, केरळ
मार्गदर्शन महत्त्वाचे
चांगल्या गुणांसाठी केवळ कोचिंगची आवश्यकता नाही. मी केवळ शिक्षक आणि वडिलांच्या मार्गदर्शनाने यश मिळविले.
- रिमझिम अग्रवाल, उत्तर प्रदेश
फोकस्ड अभ्यास आवश्यक आहे. केवळ अधिक वेळ अभ्यास करण्याने फार फायदा होत नाही.
- प्रखर मित्तल, गुरुग्राम'
तिरुअनंतपूरम विभागाचा निकाल सर्वाधिक (९९.६0) असून, त्या खालोखाल चेन्नई (९७.३७) व अजमेर (९१.८६ टक्के) हे विभाग आहेत. दिल्ली विभागाचा निकाल ७८.६२ टक्के आहे.
दीड लाख विद्यार्थ्यांना
९0 टक्क्यांहून अधिक
या परीक्षेस परदेशी शाळांतील विद्यार्थीही बसतात. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा ९८.३२% इतके आहे. या वर्षी ९५ टक्क्यांहून अधिक मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २७ हजार ४७६ असून, ९0 टक्के वा त्याहून अधिक गुण १ लाख ३१ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. ही परीक्षा १७ हजार ५६७ शाळांतील ४४६0 केंद्रांमध्ये पार पडली.