CBSE 12th Practical Exam 2021 : सीबीएसई 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर, अशी असेल नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 09:23 PM2020-11-21T21:23:16+5:302020-11-21T21:23:51+5:30
गेल्या वर्षीच्या परीक्षांप्रमाणेच यावर्षीही प्रॅक्टिकल परीक्षांसाठी इंटर्नल आणि एक्सटर्नल, असे दोन्हीही एग्झामिनर असतील. तसेच सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांची असेल.
नवी दिल्ली - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (सीबीएसई)ने शनिवारी 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसई 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षा 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान होतील. मात्र, या तारखा संभाव्य असल्याचे म्हणत, निश्चित तारखांसंदर्भातील सूचना नंतर दिली जाईल असेही बोर्डने म्हटले आहे. याच बरोबर परीक्षांसंदर्भात बोर्डाने एक एसओपीदेखील (नियमावली) जारी केली आहे. यात बोर्डाने म्हटले आहे, की प्रॅक्टिकल परीक्षेसाठी शाळांना वेगवेगळ्या तारखा पाठवल्या जातील. याच बरोबर बोर्डाकडून एक ऑब्झर्वरदेखील नियुक्त करण्यात येईल. तो प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट्सच्या मूल्यांकनावर लक्ष्य ठेवेल.
गेल्या वर्षी झालेल्या परीक्षांप्रमाणेच यावर्षीही प्रॅक्टिकल परीक्षांसाठी इंटर्नल आणि एक्सटर्नल, असे दोन्हीही एग्झामिनर असतील. तसेच सीबीएसई बोर्डाने नियुक्त केलेल्या या एक्सटर्नल एग्झामिनर्सकडूनच प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांची असेल.
मूल्यांकन झाल्यानंतर शाळांना बोर्डकडून दिल्या जाणाऱ्या लिंकवर विद्यार्थ्यांचे गूण अपलोड करावे लागतील. प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्ट मूल्यांकनाचे काम संबंधित शाळांमध्ये पार पडेल.
शाळांना अॅपवर टाकावा लागेल प्रॅक्टिकल परीक्षेचा फोटो -
या परीक्षेसाठी, सर्व शाळांना एक अॅप लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. या अॅप लिंकवर शाळांना, प्रॅक्टिकल परीक्षेदरम्यानचा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बॅचचा ग्रुप फोटो अपलोड करावा लागेल. या ग्रुप फोटोमध्ये प्रॅक्टिकल देणाऱ्या बॅचचे सर्व विद्यार्थी, एक्सटर्नल एग्झामिनर, इंटर्नल एग्झामिनर आणि ओब्झर्व्हर अरतील. तसेच या फोटोमध्ये सर्वांचे चेहरे स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे.
लवकरच जाहीर होईल वेळापत्रक -
सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी शुक्रवारी सांगितले होते, की 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा निश्चितपणे पार पडतील. तसेच, परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल. सीबीएसई यासंदर्भात विचार करत आहे. तसेच परीक्षांचे मुल्यांकन कशा पद्धतीने केले जाईल, याची माहितीही लवरच दिली जाईल. असेही त्रिपाठी यांनी सांगितले होते.
त्रिपाठी म्हणाले, मार्च-एप्रिल महिन्यात, वर्ग कशा प्रकारे चालवले जातील, यावरून सर्वच चिंतित होते. मात्र, शिक्षकांनी आणि शाळांनी परिस्थिती तसेच आवश्यकतेनुसार कार्य केले. त्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून काही महिन्यांतच ऑनलाईन वर्ग सुरू केले. यासाठी त्यांचे कौतुक व्हायलाच हवे.