...तर 500 पैकी 500 गुण पक्के होते; CBSE टॉपर हंसिकाने सांगितलं 1 मार्क गेला कसा?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:44 PM2019-05-03T13:44:53+5:302019-05-03T13:47:49+5:30
सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन(CBSE)नं 12वीचे निकाल जाहीर केले आहेत.
नवी दिल्लीः सेंट्रल बोर्ड ऑफ एज्युकेशन(CBSE)नं 12वीचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत दोन मुली टॉपर ठरल्या आहेत. त्या दोघींनी परीक्षेत 99.8 टक्के गुण मिळवून पहिलं स्थान पटकावलं आहे. त्या दोघींना परीक्षेत 500 पैकी 499 गुण मिळाले आहेत. या विजयावर टॉपर हंसिका आनंदी तर आहेच, परंतु तिला 1 गुण कमी पडल्याचं दुःखसुद्धा आहे. हंसिकानं समाजशास्त्र विषयात 12वीत पहिलं स्थान मिळवलं. तिला इंग्रजीत 99 गुण मिळाले आहेत. तर ऊर्वरित चार विषयां(पॉलिटिकल सायन्स, संगीत गायन, इतिहास आणि सायकॉलॉजी)मध्ये तिला पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. हंसिकानं 12वीच्या परीक्षेच्या तयारीसाठी कोणताही कोचिंग क्लास लावलेला नव्हता. तिनं स्वतःच अभ्यास करण्यावर जोर दिला होता.
हंसिका म्हणाली, यश मिळवण्याला कोणतीही वेळ आणि मर्यादा नसते. परीक्षेच्या तयारीसाठी मी पूर्णतः पुस्तकं आणि शाळेत शिकवल्या गेलेल्या नोट्सची मदत घेतली होती. मी कोणतंही कोचिंग क्लास लावलेला नव्हता. तसेच ऑनलाइनपद्धतीनंही अभ्यास केला नव्हता. माझा अभ्यास मी NCERTच्या पुस्तकांवरून केला आहे. अभ्यासासाठी त्यावरच माझा भर होता. सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होते, असंही ती सांगते. हंसिकाचं फेसबुक प्रोफाइल आहे. पण तरीही टॉपर सांगते, जर मी ऑनलाइन चॅट करणं आणि गेम खेळण्यासाठी जो वेळ वाया घालवला, तोच वेळ मी अभ्यासासाठी दिला असता तर इंग्रजीमध्ये 1 गुण कमी मिळाला नसता. 17 वर्षांच्या हंसिकानं स्वतःचं 12वीपर्यंतचं शिक्षण डीपीएस गाझियाबादमधून केलं आहे. तिला सायकोलॉजीमध्ये ऑनर्स करायचं आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीतल्या लेडी श्री राम कॉलेजमधून मला सायकोलॉजी ऑनर्स शिकायचं आहे.
तिची आई गाझियाबादमधील विद्यावती कॉलेजमध्ये समाजशास्त्र विषयाची प्राध्यापक आहे. तिचे वडील राज्यसभेत सेक्रेटरीपदावर कार्यरत आहेत. हंसिका सांगते, माझे वडील फार कडक स्वभावाचे नाहीत. परंतु आई शिस्तप्रिय आणि कडक आहे. हंसिका ही नियमित अभ्यास करत नसल्याचीही खंत तिनं व्यक्त केली आहे. मी सर्वच विषयांकडे विशेष लक्ष देत होती. सर्वच विषयांना ठरवलेला वेळ देण्याचा प्रयत्न करत होती. तिला इंग्रजी विषय सोडल्यास प्रत्येक विषयात 100 गुण मिळाले आहेत. तिला फक्त इंग्रजीतच 99 गुण मिळाले आहेत. तिला संगीताची प्रचंड आवड आहे. म्हणूनच त्यांनी 12वीत म्युझिकला विशेष प्राधान्य दिलं आहे. पुढे जाऊन तिला समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करायचा आहे. देशभरातील सर्व विभागांची सरासरी काढल्यास बारावीचा निकाल 83.4 टक्के इतका लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 88.7 टक्के विद्यार्थिनींनी परीक्षेत यश मिळवलं असून उत्तीर्ण झालेल्या मुलांचं प्रमाण 79.5 टक्के इतकं आहे.
यंदा 10 विभागात सीबीएसईची परीक्षा घेण्यात आली होती. पुढच्या वर्षी ती 16 विभागांमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली. यंदा त्रिवेंद्रम विभागानं बाजी मारली. या विभागातले तब्बल 98.2 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. महाराष्ट्राचा समावेश असलेला चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई विभागातल्या 92.3 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळालं. तर 91.78 टक्क्यांसह दिल्ली विभाग तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या. या दोघींनाही 500 पैकी 499 गुण मिळाले.