सीबीएसई बोर्डाचे गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटले; परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 03:52 PM2018-03-28T15:52:27+5:302018-03-28T15:57:01+5:30
या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे पेपर फुटल्याची बाब समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, दहावीचा गणित विषयाचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला आहे. त्यामुळे या दोन्ही विषयांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय सीबीएसई बोर्डाने घेतला आहे.
सीबीएसई बोर्डाकडे परीक्षा सुरू असताना काही पेपरांच्यावेळी गैरप्रकार झाल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन बोर्डाने गणित व अर्थशास्त्र या दोन विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या परीक्षांचे महत्त्व टिकून राहील आणि विद्यार्थ्यांना न्याय वागणूक मिळेल. दरम्यान, हा निर्णय विशिष्ट विभांगापुरता अथवा संपूर्ण देशभरासाठी घेतला आहे, याबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, या फेरपरीक्षेच्या या निर्णयाविरोधात काही पालक आणि शिक्षकांनी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केल्याचे समजते.
दरम्यान, पेपर फुटीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना दूरध्वनी करून तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन्ही वर्षांच्या परीक्षा ५ मार्च रोजी सुरु झाल्या होत्या. १० वीच्या परीक्षेसाठी १६ लाख ३८ हजार ४२८ विद्यार्थी बसले होते. तर १२ वीच्या परीक्षेसाठी ११ लाख ८६ हजार ३०६ विद्यार्थी बसले होते. १२ वीच्या अर्थशास्त्राच्या पेपरबरोबरच दिल्लीमध्ये जीवशास्त्राचा पेपर फुटल्याची चर्चा होती. मात्र तपासणीअंती हे खोटे असल्याचे समोर आले होते.